

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 48.5 षटकात 266 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 87 धावांची खेळी खेळली. डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशननेही भारतीय चाहत्यांची मने जिंकली आणि त्याने 82 धावा कुटल्या. या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही. खरं तर बुमराह हा हार्दिक आणि ईशाननंतर तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 16 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताला 266 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 35 धावा देत 4 बळी घेतले. नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी तीन विकेट मिळाल्या. (IND vs PAK Asia Cup)
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला 15 धावांवर रोहित शर्माच्या (11) रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर विराट कोहली (4) हा सुद्धा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यर (14) आणि शुभमन गिल (10) देखील संघाची स्थिती सुधारण्यात अपयशी ठरले. 66 धावांपर्यंत भारताने 4 विकेट गमावल्या होत्या. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताचे कंबरडे मोडत टॉप ऑर्डरला तंबूत पाठवले.
कठीण काळात, किशन आणि हार्दिकने संघाची धुरा सांभाळली आणि पाचव्या विकेटसाठी 141 चेंडूत 138 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. चांगली फलंदाजी करणारा किशन 81 चेंडूत 82 धावांची खेळी केल्यानंतर तो संघाची धावसंख्या 205 असताना बाद झाला. हरिस रौफने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर हार्दिकचे (87) शतकही हुकले.
किशनने सलग चौथे अर्धशतक झळकावले आहे. यापूर्वी, त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिकेतील सलग तीन सामन्यांत 3 अर्धशतके केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 46 चेंडूत 52 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 55 चेंडूत 55 धावा केल्या. मालिकेतील तिसर्या वनडेत त्याने 77 धावांची खेळी केली.
हार्दिकने 90 चेंडूत 87 धावांची खेळी केली. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 1 षटकारही लगावला. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे 11वे अर्धशतक आहे. वनडे फॉरमॅटमध्ये हार्दिकचे हे दुसरे अर्धशतक ठरले आहे. त्याने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 4 डावात 69.66 च्या सरासरीने आणि 132.27 च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या आहेत.
शाहिन आफ्रिदी पाकिस्तानकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात 35 धावा देत 4 बळी घेतले. पॉवरप्ले दरम्यान आफ्रिदीने घातक गोलंदाजी करत रोहित आणि कोहलीची विकेट घेतली. यानंतर त्याने डेथ ओव्हर्समध्ये 2 विकेट घेतल्या. रौफने 3 बळी घेतले. शादाब खान महागात पडला. त्याने 9 षटकात एकही विकेट न घेता 57 धावा दिल्या. नसीम शाह 3 बळी मिळवण्यत यशस्वी ठरला.
हेही वाचा;