कर्जतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे उपोषण; नगरपंचायतीत महत्त्वाची पदे रिक्त | पुढारी

कर्जतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे उपोषण; नगरपंचायतीत महत्त्वाची पदे रिक्त

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगरपंचायतीत दीड वर्षापासून प्रभारीराज असून, त्याचा नगरपंचायतीच्या कामकाजावरोबरच विकासकामांवर विपरित परिणाम होत. मुख्याधिकार्‍यांसह अन्य रिक्त पदे भरावीत, या मागणीसाठी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा उपनगराध्यक्षा रोहिणी घुले व राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषणात गटनेते संतोष म्हेत्रे, नगरसेविका ताराबाई कुलथे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, सतीश तोरडमल, भास्कर भैलुमे, मोनाली तोटे, नामदेव राऊत, ज्योती शेळके, लंकाबाई खरात, सुवर्णा सुपेकर, अमृत काळदाते, प्रतिभा भैलुमे व छाया शेलार, प्रसाद ढोकरीकर, राष्ट्रवादी काँग्रसचे युवक शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, अभय बोरा आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नगरपंचायतीत मुख्याधिकारी, शहर अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक गट क व श्रेणी ब, सहायक नगररचना (इंजिनिअर), कर निरीक्षक, सहायक कर निरीक्षक व अन्य पदे रिक्त दीड वर्षांपासून रिक्त आहेत. नगराध्यक्षा राऊत म्हणाल्या, कर्जत नगरपंचायतीतील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्याचा मोठा परीणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. नगरपंचायतीत राज्यातील सत्ताधार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शहरातील विविध कामे प्रलंबित आहेत.

गटनेते संतोष म्हेत्रे म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीनंतर आमदार रहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यावर कारभार व्यवस्थित चालू होता. मात्र, प्रा.राम शिंदे आमदार झाल्यानंतर लगेचच राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून नगरपंचायतीत राजकीय हस्तक्षेप सुरू झाला आहे. आ. शिंदे रिक्त पदांवर अधिकार्‍यांच्या नियुक्त्या होऊ देत नाहीत. उपनगराध्यक्षा रोहिणी घुले म्हणाल्या, नगरपंचायतीमध्ये महत्त्वाची पदेे रिक्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. कामे होत नसल्याने नागरिकांचा नगरपंचायतीबाबत रोष वाढत चाललेला असून, नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन, उपोषणे होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित सर्व पदांवर अधिकार्‍यांच्या नियुक्ती कराव्यात.

नगरसेविका छाया शेलार म्हणाल्या, नगरपंचायतीचे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने सर्व कामे प्रलंबित आहेत. प्रभागातील नागरिकांची कामे होत नसल्याने आम्हाला त्यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहेत. प्रशासनाने त्वरित कायमस्वरूपी मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती करून नगरपंचायातीचा विस्कळीत झालेला कारभार सुरळीत करावा.

नगरसेवक नामदेव राऊत म्हणाले, आदर्श नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसणे, ही शोकांतिका आहे. माझी वसुंधरा अभियानात बक्षिसांची रक्कम आम्हाला मिळाली. ती विकासकामांसाठी खर्च करणे अशक्य झाले आहे. आमदार रोहित पवार यांच्या चांगल्या कामांना खो घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाआरोप त्यांनी केला.

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

कर्जत नगरपंचायतीसाठी कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्तीचा अधिकार नगरविकास विभाग-2, मंत्रालय मुंबई यांना आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून सततचा पाठपुरावा सुरु आहे. सध्या जामखेडचे मुख्याधिकारी यांच्याकडे कर्जत मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. स्थापत्य, पाणीपुरवठा अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक गट क नगररचना सहायक अभियंता, कर निरीक्षक आणि सह कर निरीक्षक या पदांच्या कायमस्वरुपी नियुक्तीचे अधिकार नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक यांना आहेत.

या पदांचे अतिरिक्त कार्यभार देखील इतर कर्मचार्‍यांकडे सोपविला आहे. याबाबत राज्य शासनाला कळविण्यात येऊन पुन्हा एकदा रिक्त पदांबाबत पाठपुरावा करू, असे लेखी आश्वासन नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी पदाधिकार्‍यांना दिले. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी उपोषण मागे घेतले.

हेही वाचा

Accident : अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर अपघात; दोन जण ठार

बेळगावातील तरुणाचा खून; कोल्‍हापुरातील दोन तरूणांना अटक

जालना : ३५० मराठा आंदोलकांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Back to top button