

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगरमध्ये फेज 2 आणि शिर्डीत नव्याने एमआयडीसी उभारण्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व शेती महामंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यानंतर मंत्री विखे यांनी ही माहिती दिली. या बैठकीस खा. डॉ. सुजय विखे, महसूल विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व शेती महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने 'एक ट्रीलियन' डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्याच दृष्टीने राज्यात नवे उद्योग व नव रोजगार निर्मिती झाली पाहिजे, असा मानस आहे. नगर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नवीन उद्योगास चालना मिळावी, बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे, तसेच गावातील स्थानिकांची स्थलांतर रोखण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगर जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीच्या संदर्भात मागणी केली होती.
नगरजवळील वडगाव गुप्ता, विळद येथे 600 एकरावर फेज 2 व शिर्डी येथे 500 एकरावर एमआयडीसींना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्त्वत: मंजुरी दिल्याची माहिती विखे दिली. शासनाच्या जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी असल्याचे विखे यांनी सांगितले.
निंबळक एमआयडीसी येथील समांतर रस्त्याला, सुपा एमआयडीसीला 50 कोटींचे अद्यावत असे अग्नीशमन ( फायर) स्टेशन तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.
हेही वाचा