

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशात घालणारा अनिल परब आहे. तेच खरे शिवसेनेचे गद्दार आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज केला. शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. यावर अनिल परब यांनी रामदास कदम यांनी केलेल्या आराेपांवर उत्तर दिले. (parab vs kadam)
रत्नागिरी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीत कदम यांच्या समर्थकांना डावण्यात आले. यावरुन रामदास कदम आक्रमक होत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपावर बोलताना मंत्री अनिल परब म्हणाले की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. याबाबत नो कॉमेंट्स.." असे म्हणत, भाष्य करण्याचे टाळले.
रामदास कदम काही म्हणू दे. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्यावर त्याचे उत्तर मी देणार नाही. मी एक शिवसैनिक आहे ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबतची जी काही दखल घ्यायची आहे ती पक्ष घेईल, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली.
तत्पूर्वी रामदास कदम पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'माझ्याकडून कधीही पक्षविरोधी कृत्य झालेले नाही. दोन नेत्यांचे वाद समाजासमोर येऊ नयेत असे वाटत होते म्हणून मी काही पथ्ये पाळली. अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहे.मागील दोन वर्षे ते १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात. त्यांनी शिवसेना वाऱ्यावर सोडले आहे.कुठलाही समन्वय नाही. मध्यंतरी किरीट सोमय्या यांच्यासंदर्भात संवाद केलेली कुठलीही बाब माझ्याकडून घडली नाही. किरीट सोमय्यांशी आजपर्यंत कधीही बोललो नाही.
मध्यंतरी मिलिंद नार्वेकरांचा बंगला स्वत: तोडला. अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबतही तक्रारी झाल्या.मुळात त्यांनी हे रिसॉर्ट बेकायदा बांधलाच का? बेकायदा बांधकामे करायची आणि ते तोडले की माझ्यावर आरोप करायचे असा प्रकार सुरू आहे.मी आयुष्यभर शिवसेनेसाठी मी लढलो आहे. बाळासाहेबांची शपथ घेतो की, मी किरीट सोमय्याला कागदपत्रे दिली नाहीत. मला संपवायचा डाव शिवसेनेतील काही नेत्यांचा आहे.अनिल परब यांनी बांद्र्यातून विधानसभेला निवडून येऊन दाखवावे, महापालिकेला निवडून येऊन दाखवा.आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत असाल याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही एखाद्याला संपवायला मुखत्यार आहात, असा सवालही कदम यांनी केला केला.
हेही वाचलं का?