मुंबई, पुढारी ऑनलाईन : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत असून मुदतवाढीसाठी ते इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. वानखेडे हे महसूल सेवेतील अधिकारी असून ते एनसीबीमध्ये प्रतिनियुक्तीवर आले होते. (sameer wankhede)
मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर वानखेडे चर्चेत आले. यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर गंभीर आराेप केले. तसेच यासंदर्भातील पुरावेही सादर केले. यानंतर याप्रकरणाच्या चाैकशीसाठी एनसीबीने समितीही नियुक्त केली हाेती. मलिक यांच्याविरोधात वानखेडे कोर्टातही गेले होते. कोर्टाने मलिक यांना कोणतीही टिप्पण्णी करू नये, असे बजावल्यानंतर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबले.
समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत. सप्टेंबर २०२० पासून ते एनसीबीमध्ये प्रतिनियुक्तीवर आले होते. सध्या ते एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक आहेत. यापूर्वी ते महसूल गुप्तचर संचालनालयात तैनात होते. ते जेथे नियुक्तीला होते तेथे त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त झाला आहे. वानखेडे यांनी बहुतांश कारवाया बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि अभिनेत्यांवर केल्या आहेत. तसेच विमानतळावर तैनात असताना तेथेही त्यांनी याच व्यक्तींना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर वानखेडे हे एनसीबीचे झोनल अधिकारी म्हणून चर्चेत आले होते. हे प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतरही त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. मात्र, सुशांत सिंग प्रकरणात अनेक सेलिब्रेटींची चौकशी करून त्यांच्यावर वानखेडे यांनी कारवाई केली होती. ऑक्टोबर महिन्यात वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई किनारपट्टीवर एका क्रूझवर छापा टाकला होता. त्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य काहींना अटक केली होती. मात्र, छाप्यादरम्यान असलेले साक्षीदार आणि पंच हे भाजपचे कार्यकर्ते आणि काही गुन्हेगार निघाल्याने ही कारवाईही वादात सापडली.
छाप्यातील काही पंचांच्या कोऱ्या कागदावर सह्याही घेतल्याचा आरोप मुलाखतींतून झाला. तसेच शाहरूख खानकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे वानखेडे वादात सापडले.
नवाब मलिक आणि वानखेडे यांच्यातील वाद व्यक्तिगत पातळीवर गेला. वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून त्यांनी मागासवर्गीय जातीचा दाखला काढून नोकरी मिळविल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्याबद्दलचे पुरावेही मलिक यांनी माध्यमांसमोर मांडले. एकूणच वानखेडे हे एनसीबीसाठी डोकेदुखी ठरल्याचे समोर आल्याने त्यांच्याकडील महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास काढून घेतला.
हेही वाचलं का?