आयत्यावेळी कोलांटउड्या पहायला मिळणार; पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान नगरसेवकांतच सामना

आयत्यावेळी कोलांटउड्या पहायला मिळणार; पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान नगरसेवकांतच सामना
Published on
Updated on

पुणे: पर्वती विधानसभा मतदार संघात अनेक विद्यमान नगरसेवक आमने सामने येणार असल्याने येथील लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. विसर्जित झालेल्या महापालिका सभागृहातील अनेक सदस्य एकाच प्रभागात आल्याने अनेकांचा पत्ता आपोआपच कट होणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी आयत्यावेळी कोलांटउड्या पहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघावर मागील पंधरा वर्षात भाजपने चांगले वर्चस्व निर्माण केले आहे. महापालिकेच्या गत निवडणुकीमध्ये या मतदार संघात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या होती. तर आबा बागुल यांच्या रूपाने काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदार संघात मागील निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत रंगण्याची शक्यता आहे.

प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर पर्वतीमधील अनेक प्रभागात अनेक विद्यमान नगरसेवक आमने सामने येणार आहेत. प्रभाग 37 (जनता वसाहत दत्तवाडी) मध्ये एक जागा अनु. जाती खुल्या गटासाठी, एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी राखूव असून एक जागा खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रिया गदादे, भाजपचे आनंद रिठे, शंकर पवार, अनिता कदम हे विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याशिवाय माजी नगरसेवक राहुल तुपेरे हेही रिंगणात असतील.

प्रभाग 38 (शिवदर्शन – पद्मावती) मध्ये एक जागा अनु. जाती खुल्या गटासाठी, एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. या प्रभागात विद्यमान नगरसेविका अश्विनी कदम, आबा बागुल, महेश वाबळे, धीरज घाटे आणि माजी नगरसेवक अशोक हरणावळ हे आमने सामने येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी भाजपने घाटेंना उमेदवारी दिली तर वाबळे यांना प्रभाग 50 मधून लढावे लागणार आहे.

प्रभाग 39 (मार्केटयार्ड – महर्षिनगर) मध्ये एक जागा अनु. जाती महिला, एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे या प्रभागात विद्यमान नगरसेवक प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, आमदार सुनील कांबळे यांची मुलगी, हे भाजपकडून इच्छुक असतील. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची, असा प्रश्न निर्माण होणार आहे. याशिवाय या प्रभागात राष्ट्रवादीकडून संतोष नांगरे, बाळासाहेब अटल आदी निरवडणुक रिंगणात असतील.

प्रभाग 40 (बिबवेवाडी – गंगाधाम) दोन जागा खुल्या गटातील महिलांसाठी तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे या प्रभागात माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, मानसी देशपांडे हे भाजपचे तर राष्ट्रवादीकडून डॉ. सुनिता मोरे, सुनिल बिबवे इच्छुक आहे. या प्रभागात भाजपकडे प्रबळ दावेदार असले तरी इतर पक्षांसमोर प्रबळ दावेदार शोधण्याचे आव्हान आहे.

प्रभाग 48 (अप्पर – सुपर – इंदिरानगर) मध्ये एक जागा अनु. जाती महिला, एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी, तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे येथील विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे बाळा ओसवाल, भाजपच्या रूपाली धाडवे, वर्षा साठे यांचा मार्ग सुकर झाला आहे. विद्यमान नगरसेवकांच्या विरोधात लढण्यासाठी भाजप, राष्ट्रवादीसह इतर पक्षांना उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. आघाडी होते की नाही, यावर येथील बरेचशे चित्र अवलंबून राहणार नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश मोहिते, मनीषा मोहिते, गौरव घुले यांच्यापैकी कोणाला निवडणूक रिंगणात उतरवणार, हे पाहावे लागणार आहे.

प्रभाग 49 (बालाजीनगर – शंकर महाराज मठ) या प्रभागात दोन सर्वसाधारण महिला आणि एक खुली जागा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, मनीषा मोहिते आणि भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले गौरव घुले दावेदार आहेत. एकच जागा खुली असल्याने घुले यांच्यासमोर प्रभाग 48 चा पर्याय ठेवला जाऊ शकतो. तर भाजपकडून या प्रभागात राजेंद्र शिळीमकर आणि राणी भोसले या दोन विद्यमानासह इतर इच्छुकांची संख्या जास्त आहे.

प्रभाग 50 (सहकारनगर – तळजाई) मध्ये एक जागा अनु. जाती खुल्या गटासाठी, एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीकडून माजी सभागृहनेते सुभाष जगताप, सुशांत ढमढेरे, तुषार नांदे तर भाजपकडून महेश वाबळे, रिपाइंचे हनुमंत साठे इच्छुक असून भाजप आयत्या वेळी या प्रभागात आयात केलेला उमेदवार देण्याचीही शक्यता आहे. या प्रभागात महिला प्रवर्गासाठी अद्याप प्रबळ दावेदार दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news