मालमत्ता हडप करण्यासाठी माय-लेकाचे अपहरण; मुलाची हत्या, आईला वाचवण्यात यश

मालमत्ता हडप करण्यासाठी माय-लेकाचे अपहरण; मुलाची हत्या, आईला वाचवण्यात यश
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता हडप करून त्याची विक्री करत बक्कळ पैसा कमावण्याच्या हेतूने सातजणांनी चेंबूरमधील ८० वर्षीय वृद्ध मातेसह तिच्या ४४ वर्षीय मुलाचे अपहरण करून मुलाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यात वृद्ध मातेची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले. पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून, पोलिसांनी निलंबित बेस्ट बसचालकासह केअर टेकर महिला आणि अन्य तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

वडाळ्यातील कोरबा मिठागर परिसरात राहत असलेला निलंबित बेस्ट बसचालक मुनीर अमीन पठाण (वय ४१), चालक रोहित अनिल अदमाने ऊर्फ मुसापारकर (४०, रा. आरे रोड), राजू बाबू दरवेश (४०, रा. मिरारोड), केअरटेकर म्हणून काम करणारी ज्योती सुरेश वाघमारे (३३, मानखुर्द, म्हाडा वसाहत) आणि प्रणव प्रदीप रामटेके (२५, रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात सायरा खान आणि इमरान शेख यांचा शोध पोलिस घेत आहेत.

५ एप्रिल ते २ मे या कालावधीत हा गुन्हा घडला. चेंबूरमधील रहिवासी रोहिणी कांबळे आणि त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार रोहिणी यांच्या बहिणीने २१ एप्रिलला चेंबूर पोलिसांत दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक पुराव्यांआधारे तपास सुरू केला. पोलिसांनी वडाळा आणि पवईतून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून पोलिसांनी एक एक कडी सोडवत या मिसिंग मिस्ट्रीचा उलगडा केला. यातील आरोपींनी मालमत्ता हडप करण्याच्या हेतूने विशाल आणि रोहिणी यांचे अपहरण केल्याचे उघड झाले.

मालमत्ता खरेदी-विक्रीच्या बैठकीसाठी आरोपींनी ५ एप्रिलला विशाल आणि रोहिणी यांना पनवेलमधील एका बंगल्यावर बोलावून घेतले. तेथे त्यांनी सुरुवातीला या दोघांना गुंगीचे औषध पाजले. आरोपींनी या बंगल्यावरच विशालची हत्या केली. त्यानंतर मृतदेह वडोदरा – अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून दिला. तर सह्या अंगठ्याचे ठसे घेऊन मालमत्ता हडप करण्यासाठी रोहिणी यांना जिवंत ठेवले होते. आरोपींनी त्यांना सुरुवातीला राजस्थानमधील अजमेर येथे नेऊन डांबून ठेवले. पुढे त्यांना मुंबईत आणून गोरेगावातील आरे मिल्क कॉलनीत डांबून ठेवल्याचे समोर आले.

योजनाबद्धरीतीने छापेमारी

रोहिणी यांच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी योजनाबद्धरीतीने येथे छापेमारी करून त्यांची सुखरूप सुटका केली. गुंगीचे औषध दिले असल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news