Latest

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर वॉर

backup backup

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कराड तालुका सोसायटी मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व पणाला लागले आहे. तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही काँग्रेसने मतदारांना 'टूर'वर पाठविले आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर वॉर आहे. दोन्ही काँग्रेसचे समर्थकांमध्ये अक्षरशः वॉर सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

कराड तालुका सोसायटी मतदारसंघ संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. आजवर या मतदारसंघातून स्व. विलासराव पाटील उंडाळकर हे एकतर्फी वर्चस्व राखत विजयी होत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर आता प्रथमच निवडणूक होत आहे. स्व. विलासराव पाटील यांच्या जागेवर आपलाच हक्क असल्याचे सांगत जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत चुरस वाढवली होती. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत या मतदारसंघाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती. मात्र, दोन्ही उमेदवार आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने निवडणूक अटळ बनली आहे.

कपबशी व किटली या दोन्ही निवडणूक चिन्हांसह दोन्ही बाजूचे समर्थक शेरो-शायरी व फिल्मी डायलॉगच्या माध्यमातून विजयाचा दावा करताना दिसत आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थक 'साहेब' या शिर्षकाखाली नामदार बाळासाहेब पाटील यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. तसेच त्यासोबतच 'सिर्फ नाम ही काफी है, सामनेवाले की जमानत जप्त हो जाएगी' हा फिल्मी डायलॉगही व्हायरल केला जात आहे. त्यामुळेच कार्यकर्ते विजयाबद्दल किती निर्धास्त आहेत ? हेच पहावयास मिळत आहे.

त्याचबरोबर अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या समर्थकांकडूनही सोशल मीडियावर 'आ देखे जरा, किस मे कितना है दम' या गाण्यासोबत अ‍ॅड. पाटील यांचा फोटो व्हायरल केला आहे. तसेच 'अरे कोणी पण असू दे, सातारा जिल्हा बँकेत ह्यो विलास काकांचा ढाण्या वाघ असणार…' असाही मजकूर फोटोखाली टाकण्यात आला आहे. या दोन्ही पोस्टसोबत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून अन्य पोस्टही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत.

कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर वॉर : मतदार दोन्ही गटांनी 'टूर'वर

सध्यस्थितीत तालुक्यातील बहुतांश मतदार दोन्ही गटांनी 'टूर'वर पाठविले आहेत. त्यामुळेच ज्या सर्वसामान्य सोसायटी संचालक तसेच सभासदांना मतदानाचा अधिकार नाही, असे संचालक व सभासद मात्र सोशल मीडियावरील पोस्ट, तालुक्यातील राजकीय परिस्थिती आणि भविष्यात जय – पराजयामुळे निर्माण होणारी नवी राजकीय समीकरणे याबद्दल तर्कवितर्क लढवताना पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर गावागावात चौकात स्थानिक ग्रामस्थांच्या चर्चेचा विषय केवळ कराड तालुका सोसायटी मतदारसंघापुरताच मर्यादित असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळेच या निवडणुकीत काय होणार ? याबाबत संपूर्ण कराड तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT