नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात आहे,असा दावा शिंदे गटाचे बंडखोर प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी बुधवारी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. पंरतु राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती. छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले. राज ठाकरे यांच्या पाठिशीही शरद पवार यांचे आशीर्वाद होते, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीए सोबत येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. शिवसेनेचे ८०% खासदार नाराज असल्याचा दावा देखील केसरकर यांनी केला. एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी केसरकर दिल्लीत आले आहेत. यावेळी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे हे आपले गुरू आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार घेवून चालणे, हीच त्यांना गुरूदक्षिणा आहे,असे केरसकर म्हणाले.
खासदार हिंदुत्वाचा मार्ग सोडणार नाहीत. शिवसेनेच्या बैठकीत नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना एनडीएत येण्याची विनंती केली आहे. त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत आले पाहिजे, असे केसरकर यावेळी म्हणाले. संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत पण मनाने राष्ट्रवादीत आहेत. दोनही आमदार निवडून येणार नाही, असे शरद पवार म्हणतात. पंरतु, त्यांनी भूतकाळात रमून चालणार नाही. आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असल्याचे केसरकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजातील महिलेला मोठी संधी दिली आहे. देशात अनेक ठिकाणी नक्षल चळवळ फोफावली. त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली नसल्याने त्यांनी नक्षल चळवळीचा मार्ग निवडला. पंरतु,आज भारत देशाच्या सर्वोच्च स्थानी आदिवासी महिला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी मोठा संदेश दिल्याचे म्हणत केसरकर यांनी मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले.
हेही वाचा