ओतूर परिसरात संततधार पावसाने पिकांचे नुकसान; दुबार पेरणीचे संकट ओढावले | पुढारी

ओतूर परिसरात संततधार पावसाने पिकांचे नुकसान; दुबार पेरणीचे संकट ओढावले

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: ओतूर आणि परिसरातील सुमारे ५० गावांमध्ये गेली ८ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, संततधार पावसाने नव्याने पेरणी झालेल्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी आपसूकच दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या भागात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याने शेतकरी वर्गासह सामान्य लोकांची त्रेधा उडाली आहे. शेतातील उभ्या पिकात पावसाचे पाणी शिरल्यानेही आर्थिक नुकसान झाले आहे, तर काही शेतकऱ्यांचा चाळीत साठवलेला कांदा भिजला आहे. गावठाणात दुकानांमध्ये पाणी शिरून मालाचे नुकसान झाले आहे.

माळशेज घाट पट्ट्यातील काही भागात या पावसाने भात पिकासाठी आवणीला पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे भात लागवड सुरू असल्याचे दिसून येत आहे. ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, खामुंडी, उदापूर, डिंगोरे, मांदारने, धोलवड, उंब्रज, पिंपरी पेंढार या भागात गेली आठ दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. नदी,ओढे-नाले, शेत खाचरे सर्व तुडुंब भरून वाहत आहेत. ओतूर, डुंबरवाडी, खामुंडी, रोहोकडी, उदापूर, आंबेगव्हाण या भागात पावसाचे पाणी शेतातील उभ्या पिकात शिरल्याने टोमॅटो, मिरची, फ्लाॅवर, कोबी, सोयाबीन, झेंडू, काकडी, मका या तरकारीचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button