मुंबई : पुढारी वृत्तसेवा : त्या मुलाखतीमध्ये वाचण्यासारखे काय होते. एक विश्वविख्यात वाणीचे प्रवक्ते आणि दुसरे गर्भगळीत झालेले नेते यांचा सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम, ज्याला 'रुदाली' म्हणतात. मुलाखतीपेक्षा टिझर बरा होता. असे बरेच सिनेमे असतात ज्याचा ट्रेलर दणक्यात असतो पण सिनेमा फ्लॉप असतो. स्वतः च्या मनाला उभारी देण्यासाठी गर्भगळीत राजाने आपल्याच विदुषका समोर केलेली बातचीत यापेक्षा या मुलाखतीत काहीच नाही, अशी खरबरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केली.
शेलार म्हणाले, भाजपने भाष्य करावे की नाही हा प्रश्न आहे. आम्ही भाष्य केलेही नसते, पण सातत्याने भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केलाय. ही गोष्ट नवीन नाही. ज्यावेळी आमच्यासोबत सत्तेत होते. त्यावेळी भाजपला इशारे, त्यांना ज्यावेळी मुख्यमंत्री व्हायचे होते तेव्हा भाजपला इशारे दिले. मग मुख्यमंत्री पदावर बसले तेव्हा भाजपला इशारे आणि आता मुख्यमंत्री पदावरून स्वतःच शिवसैनिकांनी त्यांना पायउतार केले, तेव्हाही भाजपला इशारे देताहेत.
भाजपमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व आहे. भाजपला इशारे देणे, टोमणे मारणे असे केले तरी आपल्याला महाराष्ट्रात महत्व मिळणार नाही म्हणून ही वाईट खोड असून ती सुटणार नाही. राज्यातील मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. बदनामी करण्याचे कटकारस्थान आहे, असे शेलार यांनी नमूद केले.
आता सुप्रिया ताई काही बोलणार का यावर? हा महाराष्ट्रद्रोह नाही ना? तुम्ही सत्तेत असताना जसे वागलात तसे आम्ही वागणार नाही. तुमच्या विरोधात कोणी बोलले तर सोसायटीत जाऊन डोळे फोडत होतात, घरात घुसून मारत होता, सरकारी धोरणा विरोधात बोलला, पत्रकारांना घरात घुसून अटक करीत होता, असा संताप शेलार यांनी व्यक्त केला.
उद्या वाढदिवस आहे तुम्ही निरोगी राहो, आम्ही हीच प्रार्थना केली. पण तुमच्या आजारपणात तुमची सत्तेची लालसा किती होती. आजारी असताना एका दिवसासाठी महाराष्ट्र अडचणीत होता, शेतकरी अडचणीत होता, कोरोना होता तरी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री पदाचा पदभार कुणाला दिला नाही. तुमची सत्तेची लालसा एवढी होती.
त्याच आजारपणात ममता बॅनर्जी यांना का भेटत होतात? तुमचे दुत के. सी. राव यांना का भेटत होतात? शरद पवार यांच्याशी बैठका का घेत होता? काँग्रेसच्या नेत्यांशी बैठका कसल्या होत होत्या? आज फक्त सहानुभुती घेण्यासाठी आजारपणचे बोलत आहात!
त्यावेळी आम्ही कुठलाही शब्द दिलेला नाही असे वारंवार देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही जो शब्द देतो तो पाळतो.
नितीश कुमार यांना शब्द दिला होता तो आम्ही दिलेला शब्द पाळला. आम्ही एकनाथ शिंदे यांना सन्मानाने मुख्यमंत्रीपदी बसवले. तुम्ही स्वगत बोलून चित्रपटाचे संवाद करु नका. खटाटोप आणि कटकारस्थान हा तुमचा स्वभाव आहे. युतीतून निवडणूका आपण लढलो असताना त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी तुमची शिवसेना का चर्चा करत होती?
युतीची बोलणी एका बाजूला करायची आणि भाजपकडे जे पक्षप्रवेश व्हायचे ते पळवायचे काम तुम्ही केले. २०१४ ला युती कोणी तोडली? आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीचा असलेला आदर, त्यांच्या शिवसेनेशी असलेली युती असल्याने आम्ही कधी बोललो नाही. ग्रामीण महाराष्ट्रातून पक्ष प्रवेश होत होते ते चोरले कुणी? छोटे पक्ष जोडण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले त्यांना भाजपपासून तोडले कोणी? आणि युती आम्ही तोडली असे म्हणायचे? असा सवालही त्यांनी विचारलाय. २०१४ ला देखील या कपटी वृत्तीमुळे फोडाफोडी केली? तत्कालीन अध्यक्ष अमित शाह निवडणुकीपूर्वी तुमच्या निवासस्थानी आले आणि काय हितगुज केले ते एकदा जाहीरपणे सांगा, असेही शेलार म्हणाले.
२०१४ ला आमच्यासोबत सत्तेत होता. पण रोज रुसणं, राजीनामा खिशात ठेवले, रोज विरोधात अग्रलेख… सरकारमध्ये आहोत त्याच सरकारविरोधत बोलणं…ही कुठली शिवसेना करीत होती…मित्राशी कधी मित्राप्रमाणे कधी वागला नाहीत. शेलार पुढे म्हणाले-२०१७ ला युतीत असताना युतीत मी सडलो हे कोण म्हणाले? महापालिका निवडणुकीत कंडू शमण झाले ना? मग गोगलगायीच्या पायाने कोण आले? २०१९ च्या लोकसभेत कुणाचे फोटो लावून मते मागितली? २०१९ च्या विधानसभेत कुणाचे फोटो लावून मते घेतलीय? मोदींच्या नेतृत्वाने तुम्ही तरलात आता कुणाला सांगताय?
आज मुलाखतीत म्हटलंय विश्वासघात.. विश्वास घाताचा पहिला अंक शरद पवार यांच्यानंतर कुणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी केलाय. आज तुम्हाला विश्वास घात आठवतोय? रोज, असंबद्ध बोलायचे…खोटे बोलायचे….जनतेत भ्रम पसरवायचा…यातून तुमच मनोरंजन होईल. पण राज्यातील जनता याला भुलणार नाही.
निवडणुकीला सामोरे जायचे म्हणता, तर तुम्हाला आधी राजीनामा द्यावा लागेल. तुम्हाला चॅलेंज आहे जे १२ ते १३ जण तुमच्यासोबत आहेत त्यांनी राजीनामे द्यावे आणि दोन हात करावे. आदित्य ठाकरे यांच्यासह सगळे तुम्ही भाजपच्या मतांवर निवडून आला आहात. जे आता ४० आमच्यासोबत आलेत, त्यांनी युतीसोबत मते मिळवली, ते युतीसोबत आहेत, असे शेलार यांनी म्हटले आहे.
संघर्षाला भाजप कधी घाबरली नाही. सातत्याने आम्ही ५० वर्षे संघर्ष करतोय. सत्याला आधारित कधी गोष्टी करायच्या नाहीत आणि स्वमनोरंजन करावी, ही आजची मुलाखत आहे. नितीश कुमार जेव्हा आमच्या विरोधात होते. तेव्हा जरूर टीका करायचे. पण, बरोबर असताना तुमच्यासारखी टीका त्यांनी कधी केली नाही. तुम्ही तर बरोबर असताना टीका केली. तुम्ही आणि तुमची शिवसेना उलट्या काळजाचे आहेत. आमच्यासोबत असताना तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली त्याचे काय?
पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी गेलात आणि पदस्पर्श केलात नाही. मुख्यमंत्र्यांनी पदस्पर्श का केला नाही? याचे उत्तर द्या. कुठल्या हिंदुत्वाची गोष्ट तुम्ही बोलता. मग, गणेशोत्सवावर बंदी तुम्ही का घातली? सरकारमध्ये असताना लालबागचा राजा बसवू नये असे तुम्ही सांगता? पालघर साधूंची हत्या झाली काय केलं तुम्ही? आमच्याशी बरोबरी करू नका जनता तुम्हाला माफ करणार नाही!, असेही ते म्हणाले.