जीनिव्हा ; वृत्तसंस्था : मलेरिया या आजारावर जगातील पहिलीच प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली असून, 'आरटीएस एस/एएस 01' असे या लसीचे नामकरण करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही लस लवकरच जगभरात उपलब्ध होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या लसीला मान्यता दिल्याने जगाचे दरवाजे या लसीसाठी खुले झाले आहेत.
जगभरात दर वर्षाला तब्बल 4 लाख लोकांचा मृत्यू मलेरिया या डासजन्य आजारामुळे होतो. मलेरियाने मरण पावणार्यांमध्ये आफ्रिका खंडातील गरीब देशांतील लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. मलेरियामुळे होणार्या मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्यात आता मोठे यश मानवजातीला प्राप्त होणार आहे.
आफ्रिकन देशांतून साधारणपणे दर मिनिटाला एका लहान मुलावर मलेरियामुळे जीव गमावण्याची वेळ ओढवते. यावरून या आजाराचे गांभीर्य लक्षात येते. जगातील एकूण मलेरिया मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू आफ्रिकेतील 6 देशांमध्ये होतात. एक तृतीयांश मृत्यू एकट्या नायजेरियात होतात.
जगात विषाणू आणि जीवाणूंविरोधात अनेक लसी उपलब्ध आहेत. डासजन्य परपोषींवर मान्यता प्राप्त झालेली ही पहिलीच लस आहे. प्लास्मोडीयम फाल्सीपेरम
प्रकारातील मलेरियाला कारणीभूत ठरणारे डास चावले तरी या लसीचे डोस पूर्ण केलेले असतील तर या प्रकारचा मलेरिया होत नाही, असे चाचणीअंती निष्पन्न झाले आहे.
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनीही मलेरियावर मॅट्रिक्स-एम ही लस तयार केली आहे. मॅट्रिक्स-एम या लसीची परिणामकारता 75 टक्क्यांवर असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. जर्मनीतील बायोएन्टेक कंपनीनेही आरएनए तंत्रावर आधारलेली मलेरियावरील लस तयार केली असून, आगामी वर्षात या लसीच्या चाचणीस सुरुवात होणार आहे. फायझर या अमेरिकन कंपनीसोबत बायोएन्टेकने याआधी संयुक्तपणे कोरोनावरील लसही तयार केली आहे.
'जीएसके' या फार्मास्युटिकल्स कंपनीने ही लस 1987 मध्येच तयार केली होती. घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिकन देशांमध्ये 2019 पासून या लसीचे 20 लाख डोस चाचणी म्हणून देण्यात आले होते. डेटा परीक्षणाअंती जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला अखेर व्यापक वापरासाठी मान्यता दिली.
आफ्रिकेतील सहारा वाळवंटीय देशांतील लहान मुलांवर या लसीच्या वापराची शिफारसही संघटनेने केली आहे. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना या लसीचे 4 डोस देण्यात येणार आहेत.