कोरोनाची तिसरी लाट दसरा दिवाळीनंतर शक्य; लसीकरण वेगाने | पुढारी

कोरोनाची तिसरी लाट दसरा दिवाळीनंतर शक्य; लसीकरण वेगाने

मुंबई, पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रचंड मनुष्यहाणी झाल्यानंतर #कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असे म्हटले जात होते. मात्र, सर्व व्यवहार खुले झाल्यानंतर दसरा आणि दिवाळीनंतर राज्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

दीड वर्षांत कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली. या लाटेदरम्यान अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचा वेगही वाढला आहे. सध्या राज्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. त्यामुळे तिसरी लाट येणार नाही, असे म्हटले जात होते. बहुतांश नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्यामुळे लागण झाली तरी बरे होण्याचा वेग वाढत आहे.

राज्यात आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून सर्व मंदिरे प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व मंदिरांत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली. राज्यात #कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत ‘मिशन कवच कुंडल’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

यात १५ ऑक्टोबरपर्यंत वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही, अशी काळजी या कालावधीत घेतली जाईल. राज्यात उद्यापासून दररोज १५ लाख लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या राज्यात एक कोटी लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

गंभीर परिणाम होणार नाही

टोपे म्हणाले, ‘दसरा आणि दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवरच आपण विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाहीत. लसीकरण हाच आपल्याकडे मोठा पर्याय आपल्याकडे आहे. मालेगावसारख्या ठिकाणी अद्याप लसीकरण झालेले नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांचं सहकार्य घेऊ.’

हेही वाचा : 

Back to top button