File Photo  
Latest

पुणे : अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा प्रियकराने काढला काटा

निलेश पोतदार

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रियकराने काटा काढला. हा प्रकार औंढे, (ता. खेड जि. पुणे) येथे उघडकीस आला आहे. खुनाचा हा गुन्हा तब्बल दीड महिन्यांनंतर उघडकीस आणण्यात खेड पोलिसांना यश आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, औंढे येथील तरुणाचा मृतदेह २६ जून रोजी चासकमान धरणातंर्गत असलेल्या वाळद गावच्या पुलानजीक पाण्यात आढळून आला होता. खेड पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला.

मृत तरुण हा स्वतःच्या वाहनातून प्रवाशी वाहतूक करण्याचा व्यवसाय करत होता. या प्रकरणाबाबत गावात मात्र अनैतिक संबंध व त्यातून खून झाल्याचा सशंय व्यक्त केला जात होता.

गावातील एक दुकानदार आणि अवैध दारु धंदा विक्रेता असणारा व्यक्ती यांचे मृताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची दबक्‍या आवाजात चर्चा होती. खुनाच्या घटनेनंतर दीड महिना उलटूनही याबाबत पोलिसांना धागेदोरे मिळत नव्हते.

अखेर वरिष्ठ लोकप्रतिनिधी पातळीवरुन याला वाचा फुटल्याने अखेर पोलिसांनी खुनाच्या घटनेत सहभाग असलेल्या व मुंबईत राहणाऱ्या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवल्यावर अनैतिक संबंध व त्यात अडसर असलेला पतीचा प्रियकराने काटा काढला हे समोर आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी, प्रियकराला सोमवारी (दि १६) औंढे गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड हे करीत आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती पोलिस स्टेशनकडून मिळाली नसली तरी गुन्ह्याची कबुली आरोपीनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक राहुल लाड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT