पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील काँग्रेस आमदारांची सायंकाळी पाच वाजता बैठक बोलविल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले असून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना 'असा अपमान सहन करून काँग्रेसमध्ये राहू शकत नाही' असे सांगितले आहे.
बैठकीआधीच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पक्षाला रामराम करण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री सिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पंजाबचे प्रभारी हरिश रावत यांनी पाच वाजता आमदारांची बैठक बोलविली आहे.
या बैठकीत विधीमडळ नेता निवडला जाण्याची शक्यता होती. ४० नाराज आमदारांनी पत्र लिहिल्यानंतर चंदीगढमध्ये बैठक बोलविण्यात आली.
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या बैठकीत काँग्रेस नेतृत्वबदल करण्याचा अंदाज आल्याने सिंग यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'अशा प्रकारे अपमान खूप झाला. हे तिसऱ्यांदा घडतेय.
मी अशा प्रकारे अपमान सहन करून पार्टीत राहू शकत नाही.' असे सोनिया गांधी यांना सिंह यांनी सांगितले आहे.
आज होणारी बैठक अमरिंदर सिंग यांच्यावर गंडांतर आणू शकते.
जवळपास ४० नाराज आमदारांनी त्यांना हटविण्याची मागणी केली आहे.
त्यांनी हायकमांडला चिठ्ठी लिहून बैठक घेण्याची मागणी केली.
या आमदारांच्या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणार आहे. पर्यवेक्षक म्हणून हरीश रावत आणि अजय माकन उपस्थित राहणार आहेत.
मागील महिन्यात चार मंत्री आणि काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याविरोधात आपला असंतोष व्यक्त केला होता.
आमदार म्हणाले होते की, आता आम्हाला मुख्यमंत्र्यावर भरवसा नाही. जनतेला दिलेली आश्वासने ते पूर्ण करू शकत नाहीत.
काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरिश रावत यांनी ट्विट करून आजच्या बैठकीची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची तातडीनं बैठक घ्यावी, असं काही आमदारांनी सूचवलं होतं.
त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता पंजाब प्रदेश कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे.
सर्व काँग्रेसच्या सर्व आमदारांनी तिथं उपस्थित राहावं,'
हेही वाचा: