

धारूर ; पुढारी वृत्तसेवा : धारूर घाटात अपघातात चालक ठार झाला. धारूर घाटातील रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच घाटात अपघाताची मालिका सुरू आहे. आज (शनिवार) सकाळी नऊ वाजता घाटातून सिमेंट घेऊन टँकर सोलापूर येथून परभणीकडे जात हाेता. दरम्यान पलटी झाला. धारूर घाटात अपघातात चालक ठार झाला. यामुळे वाहन चालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धारूर येथील घाटात आज सकाळी नऊ वाजता अवघड वळणावरती सिमेंटचा टँकर एम एच 12 एन एक्स 4090 हा घाटातील 200 ते 300 फूट दरीमध्ये पलटी झाला.
या अपघातात सिमेंट टँकरचालक पैगंबर पटेल (वय 40) हा जागीच ठार झाला.
यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात वाहनचालकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
वेळोवेळी सांगून देखील हा अरुंद रस्ता दुरुस्त होत नाही. दळणवळणासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना नागरिकांना तसेच वाहनधारकांना करावा लागत आहे.
या घाटातील संरक्षक कठडे पूर्णतः पडलेले असून याकडे रस्ते विकास महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.
त्यामुळेच अधिकारी मनमानी करून थातूरमातूर काम करून मोकळे होत आहेत. याचा त्रास वाहनधारकांना होत असून आर्थिक तसेच जीवित हानी होत आहे.
लोकप्रतिनिधींना या घाटाच्या दुरुस्तीसाठी किती बळी हवेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता तरी या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्याची रुंदी वाढवावी.
अवघड वळण सोपे करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक तसेच वाहनधारकांतून होत आहे.
लोकप्रतिनिधी आहे का नाही? असा प्रश्न धारुर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. धारूर घाटातील रस्त्याचा प्रश्न कित्येक दिवसांपासून रखडलेला आहे.
याकडे लोकप्रतिनिधी पाहायला तयार नाहीत. त्यामुळे वारंवार अपघात होऊन प्रवासी वाहन चालक मृत्यूमुखी पडत आहेत.
अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना कधी जाग येईल. घाटातील रस्त्यांची समस्या केंव्हा दूर होईल व वाहनधारक व प्रवासी भयमुक्त प्रवास कधी करतील असा प्रश्न धारूर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.