नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : डासना मंदिराचे महंत आणि द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले यती नरसिंहानंद (yati narasimhanand) यांनी हिमाचल प्रदेशच्या अखिल भारतीय संत परिषदेत प्रवेश करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. आपल्या वादग्रस्त आणि बेजबाबदार विधानामुळे तुरुंगवास आणि न्यायालयीन खटल्याचा सामना करणाऱ्या नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा अल्पसंख्याकांवर हल्ला चढवला आहे.
उना जिल्ह्यातील मुबारकपूर येथे अखिल भारतीय संत परिषदेने आयोजित केलेल्या तीन दिवसीय 'धर्म संसद'च्या पहिल्या दिवशी यती नरसिंहानंद म्हणाले (yati narasimhanand) की, मुस्लीम योजनाबद्ध पद्धतीने अनेक मुले निर्माण करून त्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढवत आहेत. त्यामुळे देशातील वाढत्या लोकसंख्येला मुस्लीम जबाबदार असल्याचे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले आहे.
त्याच वेळी, या धर्मसंसदेला उपस्थित असलेले दुसरे संत, यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी नरसिंहानंद (yati narasimhanand) यांच्याशी सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की मानवतेचे, सनातन धर्माचे आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी अधिक मुलांना जन्म दिला पाहिजे. यासोबतच सरस्वती म्हणाले, "देशातील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हिंदूंच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आणि सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्म द्यावा."
यती सत्यदेवानंद सरस्वती म्हणाले, "हिंदू समाजाचे विलास आणि भोगवादाच्या भोवऱ्यात अडकून सतत अध:पतन होत आहे. आपल्या समाजाच्या रक्षणासाठी आपण संघटित व्हायला हवे, तरच आपण राहू आणि आपला सनातन धर्म कायम राहील." दुसरीकडे, यती नरसिंहानंद सरस्वती म्हणाले, "एक काळ असा होता की अमरनाथ आणि माता वैष्णोदेवीच्या यात्रेवर मुस्लिम समुदायाकडून दगडफेक केली जात होती. पण आज तसे नाही."
नरसिंहानंद (yati narasimhanand) म्हणाले की, देशात इतकी वाईट परिस्थिती आहे की रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांवर दगडफेक केली जात आहे. हिंदू समाजाचे यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते.
नरसिंहानंदांनी हिंदूंना एका विशिष्ट धर्माविरुद्ध उघडपणे शस्त्रे उचलण्याचे आवाहन केले. इतकंच नाही तर सभेत सहभागी वक्त्यांनी अल्पसंख्याकांच्या कथित हत्यांबाबतही भाष्य केले आहे.
जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या हरिद्वार धर्म संसदेत यति नरसिंहानंद आणि वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी मुस्लिमांविरुद्ध नरसंहारासारख्या गोष्टी बोलल्या होत्या, अशी माहिती आहे. त्यामुळे नरसिंहानंद आणि वसीम रिझवी यांनाही अटक करण्यात आली होती आणि 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने नरसिंहानंद यांची जामिनावर सुटका केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने नरसिंहानंद यांच्या जामीन अटींमध्ये अशी अटही जोडली आहे की, ते अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. पण असे असूनही, अशा कार्यक्रमांना पुन्हा हजेरी लावत आहेत.