कोल्हापूर : शहरातील बसस्थानके, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर व अन्य सार्वजनिक ठिकाणी सुमारे 350 मनोरुग्ण आढळून आले आहेत. अवनि संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. यापैकी 65 रुग्णांवर उपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले आहे. काही जणांची व्यवस्था सीपीआरमध्ये केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मनोरुग्णांचे पुनर्वसन केंद्र नसल्याने अनेक अडचणींचा सामना स्वंयसेवा संस्था कार्यकर्त्यांना करावा लागतो. बर्याचदा अशा मनोरुग्णांना नातेवाईकही स्वीकारत नाहीत. (World Mental Health Day )
संबंधित बातम्या :
सीपीआरमध्ये काही काळापुरते उपचार करण्याची सोय आहे. परंतु, मनोरुग्णांसाठी पुनर्वसन केंद्राची आवश्यकता आहे. कोल्हापूर शहरात अनेक मनोरुग्ण विविध सार्वजनिक ठिकाणी आढळून येतात. बसस्टॉप, उद्याने आदी ठिकाणी हे मनोरुग्ण आढळतात. बरेच मनोरुग्ण इतर शहरातून याठिकाणी रेल्व किंवा एस.टी.ने आणून सोडल्याची माहिती आहे. या मनोरुग्णांवर वेळेत उपचार केले, तर ते बरे होऊ शकतात. त्यांना नातेवाईकांनी सांभाळायला हवे. त्यांची काळजी घ्यायला हवी. वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि सुरू केलेला उपचार पूर्ण केला, तर हे रुग्णदेखील सामान्य जीवन जगू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशा रुग्णांची काळजी घ्यायला हवी. (World Mental Health Day )
मनोरुग्णांसदर्भात 'अवनि'कडे माहिती आल्यास संबंधित मनोरुग्णाला पोलिसांच्या मदतीने रेस्क्यू केले जाते. त्याची पूर्णपणे स्वच्छता केली जाते. त्यानंतर त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले जाते. संबंधित रुग्ण मनोरुग्ण असल्याचा दाखला घेऊन मग त्याला रत्नागिरी येथील पुनर्वसन केंद्राकडे उपचारासाठी पाठविले जाते. जे मनोरुग्ण येथेच चांगल्या पद्धतीने राहू शकतात, त्यांना निवारा केंद्र किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात येते. (World Mental Health Day )
अनामिक भीती, भास, नैराश्य, अनुवंशिकता अशा विविध कारणांमुळे मनोरुग्णांकडे वाटचाल सुरू होते. अशा रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज असते. कुटुंबीय, सामाजिक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष देऊन वेळीच उपचार केले, तर मनोरुग्णाला सामान्य जीवन जगता येईल.
डॉ. कावेरी चौगुले, मनोरुग्ण तज्ज्ञमनोरुग्णांच्या पुनर्वसनासंदर्भात खूप चांगले कायदे आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. विविध प्रकारांच्या मदतीतून मनोरुग्णांचे पुनर्वसन करता येते. समाजाने या रुग्णांकडे सकारात्मक द़ृष्टिकोनातून पाहावे.
संजय पाटील, उपाध्यक्ष, 'अवनि'