पुढारी ऑनलाईन डेस्क : "महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्षे तरी भाजपची सत्ता येणार नाही. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रीही होणार नाही. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधानही त्यांचा माणूस होईल. व्हाईट हाऊसमध्येही त्यांचा पंतप्रधान असेल, असेही ते सांगू शकतात. महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचे भविष्य आहे", असा टोला शिवसेना खासदरा संजय राऊत यांनी आज भाजपला लगावला. (शिवसेना विरुद्ध भाजप)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "जे वैफल्यग्रस्त असतात, ते निराश मनाने राजकारण करतात. त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. त्यांचा जागतिक स्तरावरचा पक्ष आहे; पण काहीही झालं तर महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही", असे मत संजय राऊत यांनी मांडले.
"युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर काही बोलत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजपा युतीत आम्ही थोडंफार आम्ही २५ वर्ष एकत्र होतो, नांदलो ते नातं भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे. वैफल्यग्रस्त, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते", असंही राऊत म्हणाले. (शिवसेना विरुद्ध भाजप)
"स्थानिक पातळीवर स्थानिक राजकारण्याच्या नावाखाली काही भ्रष्ट हातमिळवणी होत असतात. आमची भाजपासोबत युती असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. आता अशी मनमानी चालणार नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही दक्षता घेत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेही घ्यावी. जास्तीत जास्त आपले नगराध्यक्ष निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम करावं", असंही आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
हेही वाचलं का?