कर्नाटकचा ‘पुष्पा’ सांगलीत पकडला ! तब्बल २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त

कर्नाटकचा ‘पुष्पा’ सांगलीत पकडला ! तब्बल २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त

मिरज : पुढारी वृत्तसेवा ; कर्नाटकातील बंगळूर येथून कोल्हापुरात होत असलेल्या आंतरराज्य रक्‍तचंदनच्या तस्करीचा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी रविवारी मध्यरात्री पर्दाफाश केला. पोलिसांनी 2 कोटी 45 लाख 85 हजारांचे रक्‍तचंदन आणि 10 लाखांचा टेम्पो असा 2 कोटी 55 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्‍त केला.

रक्‍तचंदनची तस्करी करणारा टेम्पोचालक यासीन इनायतउल्ला खान (रा. आड्डीगर कलहळ्ळी, ता. अनेकळ, जि. बंगळूर) याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बंगळूर येथून कोल्हापुरात फळ वाहतूक करणार्‍या (के.ए. 13 – 6900) टेम्पोमधून सुमारे एक टन रक्‍तचंदनची तस्करी होणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना मिळाली होती. फडणीस यांनी तत्काळ ही माहिती पोलिस अधीक्षक गेडाम, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांना दिली.

कोट्यवधी रुपयांच्या रक्‍तचंदनची तस्करी होणार असल्याने महात्मा गांधी चौक पोलिस आणि वन विभागाकडून मिरज-कोल्हापूर रस्त्यावर जुना जकात नाका येथे मध्यरात्री सापळा लावण्यात आला. संशयास्पद टेम्पो मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आला. त्यावेळी फडणीस यांनी तो अडविला. चालकाकडे चौकशी केली. त्याने टेम्पोतून फळ वाहतूक करत आहे, असे सांगितले. परंतु, पोलिसांनी टेम्पोची तपासणी सुरू केली. त्यावेळी टेम्पोच्या पाठीमागे सुमारे दोनशे ते अडीचशे फळे ठेवण्याचे मोकळे कॅरेट होते. त्याबाबत फडणीस यांनी संशयित खान याच्याकडे चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी टेम्पोतील सर्व कॅरेट खाली उतरविले. त्यावेळी कॅरेटच्या आतील बाजूस ताडपत्रीमध्ये 983 किलो 400 ग्रॅम रक्‍तचंदन ठेवल्याचे निदर्शनास आले. वनक्षेत्रपाल पाटील यांनी ते ओंडके रक्‍तचंदनचेच असल्याची खात्री केली. बाजारभावाने त्याची 2 कोटी 45 लाख 85 हजार रुपये किंमत होते, असे सांगितले. या कारवाईमुळे बंगळूरमधून कोल्हापुरात होत असलेल्या रक्‍तचंदनच्या तस्करीचे आंतरराज्य रॅकेट उघड झाले आले.

टेम्पोचालक खान याने चौकशीत हे रक्‍तचंदन बंगळूरमधील शाहबाज याचे आहे. त्याने ते कोल्हापुरात पोहोचविण्यास सांगितले असल्याचे सांगितले. कोल्हापुरात या तस्करीच्या कनेक्शनचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खान याला सोमवारी न्यायालयात हजर केले. हा आंतरराज्य गुन्हा असल्याने अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

'पुष्पा' चित्रपटाशी साधर्म्य

आंध्र प्रदेशातील घनदाट जंगलात आढळून येणार्‍या रक्‍तचंदनची सर्व यंत्रणांना चकवा देत तस्करी केली जाते, यावर प्रकाश टाकणारा 'पुष्पा' हा तमिळ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये पोलिस आणि वन विभागाची दिशाभूल करीत कोट्यवधी रुपयांच्या रक्‍तचंदनची तस्करी केली जाते, असे दाखवले आहे.

तशीच घटना सोमवारी मिरजेत उघडकीस आली. कर्नाटकातील पोलिसांना चकवा देत यासीन खान मिरजेत आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. 'पुष्पा' सिनेमाशी ही घटना मिळतीजुळती असल्याने सोशल मीडियावर कर्नाटकातील 'पुष्पा' मिरजेत पकडला अशाच पोस्ट पडत होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news