पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल, ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. याचे मला खरच दु:ख झाले आहे. पण जेव्हा मी मुख्यमंत्रीपद सोडले तेव्हा लोक रडले, राज्यातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले. यासाठी मी महाराष्ट्रातल्या नागरिकांचा ऋणी आहे.
"असं क्वचित होत असेल की, एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर तो आपलं पद सोडताना लोकं रडतात. ही माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे! तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंची कधीही प्रतारणा होणार नाही…, हे अश्रू माझी मोठी ताकद" असल्याचे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते जनतेशी संवाद साधत होते.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही आणि शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही. मी मुंबईसाठी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो की, तुम्ही माझ्या पाठीत सुरा खुपसला पण मुंबईच्या काळजात खुपसू नका. आता तर तुमच्या वर आणि खाली पण तुमचेच सरकार आहे, त्यामुळे मुंबईचा विकास करा.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. मी पर्यावरणाच्या सोबत आहे. मुंबईसाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मेट्रो कारसाठी आरेचा आग्रह करू नका. आरेमध्ये काही प्रमाणात वृक्ष तोडून देखील आजही येथे वन्यजीव अस्तित्वात आहे. आरेचा निर्णय बदलल्याने मला दु;ख होत आहे. आता वरखाली तुमचंच सरकार आहे. त्यामुळे आरेमध्ये कारशेडचा प्रयोग करू नका.