पीओपी मूर्तिकारांवर आर्थिक संकट; कर्जाचा बोजा वाढणार | पुढारी

पीओपी मूर्तिकारांवर आर्थिक संकट; कर्जाचा बोजा वाढणार

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा
जेमतेम दोन महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी पेण येथील लाखो गणेशमूर्ती विक्रीसाठी देशभर रवाना झाल्या आहेत; तर तितक्याच मूर्तींवर कारागीर शेवटचा हात फिरवत आहेत. असे असतानाच पीओपीवरील बंदी कायम ठेवण्याच्या निर्णयाने कारखान्यांतील लगबग अचानक मंदावली आहे. पेण तालुका गणेशमूर्ती निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः पीओपीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींना चांगली मागणी असल्याने तालुक्यातील हजारो कारागिरांनी या व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतले, पण या निर्णयामुळे हाच व्यवसाय त्यांना आर्थिक संकटात नेणारा ठरत आहे.

मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील कारागिरांचा पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी कायदेशीर लढा सुरू आहे. सुरुवातीला हरित लवादाकडे दाद मागितल्यानंतर दिल्ली सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा लढला गेला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवरील बंदी आणण्याचा यापूर्वी दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. एकट्या पेण तालुक्याचा विचार केल्यास 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज कारखानदारांच्या डोक्यावर आहे. यात बंदीमुळे साधारण 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

पेण येथून पीओपीपासून तयार केलेल्या मूर्ती इतर शहरांमध्ये व्यापारी विक्रीसाठी नेतात. हे व्यापारी नेहमीचे असल्याने मूर्तींची विक्री झाल्यानंतरच मूर्तींची मूळ रक्कम कारखानदारांना परत करत असतात. न्यायालयाच्या बंदीमुळे ग्राहक मूर्तींची अपेक्षित किंमत देण्यास तयार होणार नाहीत. जर का स्थानिक प्रशासनाने पीओपीवरील बंदीची सक्तीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली तर पाठवलेल्या काही मूर्ती न विकता परत पाठवल्या जाऊ शकतात. याचा मोठा फटका येथे घरोघरी चालणार्‍या गणेशमूर्ती कारखानदारीला बसण्याची शक्यता आहे.

गणेशमूर्ती बनवण्यासाठी केलेली गुंतवणूक पुन्हा काढून घेता येणे शक्य नाही. कच्चा माल, रंगरंगोटी, कारागिरांची मजुरी दिलेली आहे. काही मूर्ती बाजारात दाखल झालेल्या असताना कायम ठेवण्यात आलेल्या बंदीमुळे कारागीर आर्थिक संकटात सापडणार आहेत. राज्यात मूर्तिकलेवर साधारण 22 लाख व्यक्तींचा उदरनिर्वाह चालत आहे, त्यांच्यावरही परिणाम होणार आहे.
रविकांत म्हात्रे, श्रीगणेश मूर्तिकार प्रतिष्ठान, अध्यक्ष, महाराष्ट्र

Back to top button