मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी आम्ही लवकरचं फोडणार आहोत आणि विकासाची मलई ही प्रत्येक शेवटच्या माणसांपर्यंत विकासाच्या रुपात पोहचविणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर दहीहंडी व गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध दूर झाले. याच प्रमाणे नवरात्री उत्सवही उत्साहात साजरा केला जाणार आहे. आता दहीहंडी उत्सवात सहभागी होणारे गोविंदा हे फक्त गोविंदा राहिले नाहीत, तर ते आता खेळाडू झाले आहेत. गोविंदांना मुख्यमंत्र्यांनी १० लाखांचे विमा कवच दिले असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. भाजपा मागाठाणे विधानसभा आणि शिवराज प्रतिष्ठान यांच्याकडून दहिसर, अशोकवन येथे दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी भाजपाचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, कृपाशंकर सिंह, दहीहंडी उत्सवाचे आयोजक मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अशोकवन येथील दहिहंडी उत्सवात १ लाख ११हजार १११ रुपयांची दही हंडी लावण्यात आली होती. यावेळी सुमारे २५० गोविंदांनी दही हंडीला सलामी दिली. यावेळी विविध दहीहंडी पथकांना अनेक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले होते.
यंदाची दहीहंडी ही ख-या अर्थाने हिंदुत्वांची हंडी आहे. गोविंदा हे आपली परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम करीत असतात. गोविंदांच्या चेह-यावर प्रचंड उत्साह जाणवत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे दही हंडी उत्सवावर निर्बंध होते. परंतु आम्ही ठरविले की, सर्व सण-उत्सव राज्यात जल्लोषात साजरा व्हायला पाहिजे. तुम्ही दहीहंडी मधील हंडी फोडत आहात. आम्ही पण दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून मोठी हंडी फोडली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. त्यामुळे येणारे सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुया, आपली संस्कृती व परंपरा पुढे नेऊया व राज्य सर्व सामान्यांचे आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे सरकार आहे. सर्व सामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.