

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे ऐतिहासिक 'माणगाव परिषदे'चा शताब्दी महोत्सव मोठ्या दिमाखदार सोहळ्याने साजरा करावा, या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रित करावे, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालयात नियोजनाबाबत बैठक घेवून हा कार्यक्रम राज्य शासनाच्यावतीने थाटामाटात करू, अशी ग्वाही दिली असल्याची माहिती आमदार आवाडे यांनी दिली.
हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगावमध्ये १९२० मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली 'माणगाव परिषद' झाली होती. या ऐतिहासिक परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. कोरोना असल्यामुळे दोन वर्षे शताब्दी महोत्सव साजरा होऊ शकला नाही. मात्र, आता लवकरच माणगाव परिषद शताब्दी महोत्सव व तिथे उभे केलेले लंडन हाऊस, हालो ग्राफिक शो व जुना तक्क्याचे झालेले सुशोभीकरण या सर्व गोष्टींचा लोकार्पण सोहळा करावा, अशी मागणी आवाडे यांनी निवेदनात केली आहे.
माणगाव येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे, या हेतूने समाजातील काही दलित बांधवांनी आपली स्वतःची जमीन दिली आहे. त्या जमिनीचा योग्य मोबदलाही त्या बांधवांना मिळावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनातील सर्व मागण्यांबाबत लवकरच मुंबईत बैठक घेऊन कार्यक्रमाची तारीख निश्चित केली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती आवाडे यांनी दिली.
हेही वाचलंत का ?