विश्वसंचार

तीनवेळा खोकून कोरोनाचे निदान!

सोनाली जाधव

लंडन : सध्या कोरोना संक्रमणाचा छडा लावण्यासाठी 'आरटी-पीसीआर' टेस्ट आणि रॅपिड अँटिजेन टेस्टचा वापर केला जातो. आता स्वीडनच्या संशोधकांनी म्हटले आहे की ब्रेथ टेस्ट म्हणजेच श्‍वासाच्या चाचणीतूनही कोरोना संक्रमण समजू शकते. विशेषतः विशिष्ट उपकरणात तीनवेळा खोकल्यावर अधिक चांगल्याप्रकारे कोरोनाचे निदान होऊ शकते.

'एन्फ्युएंझा अँड अदर रेस्पिरेटरी व्हायरस' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. गोथेनबर्ग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी 'पार्टिकल्स इन एक्सहेल्ड एअर' आणि ब्रेथ एक्सप्लोअर' नावाची उपकरणे विकसित केली आहेत. या संशोधनात तीन पद्धतीने कोरोना नमुने गोळा करण्यात आले. पहिल्या पद्धतीत लोकांनी उपकरणामध्ये वीसवेळा श्‍वास घेतला आणि सोडला. दुसर्‍या पद्धतीत दीर्घ श्‍वास सोडून काही वेळ श्‍वास थांबवण्यात आला. तिसर्‍या पद्धतीत या उपकरणामध्ये तीनवेळा खोकण्यास सांगण्यात आले. संशोधकांना आढळले की उपकरणात खोकल्यामुळे ब्रेथ टेस्टचे परिणाम सर्वात चांगले येतात. दुसर्‍या क्रमांकावर दीर्घ श्‍वास सोडणे आणि तिसर्‍या क्रमांकावर नेहमीचा श्‍वासोच्छ्वास होता.

खोकणार्‍या 25 पैकी 8 नमुन्यांमधून कोरोना संक्रमण दिसून आले. तसेच दीर्घ श्‍वास सोडण्याच्या 25 पैकी 3 तसेच सामान्य श्‍वासोच्छ्वासाच्या 25 पैकी 2 नमुन्यांमध्ये कोरोना संक्रमण आढळले. हे सर्व नमुने 'पार्टिकल्स इन एक्सहेल्ड एअर' या उपकरणातून घेण्यात आले होते. दुसर्‍या प्रकारचे उपकरण हे हाताने चालवता येणारे आहे. त्यामध्ये सामान्य श्‍वासोच्छ्वासाची जे नमुने घेण्यात आले त्यापैकी दोन पॉझिटिव्ह आढळले. संशोधिका एमिलिया विकलुंड यांनी सांगितले की या ब्रेथ टेस्टमधून अतिशय छोट्या आकाराच्या कणांचा छडाही लावता येऊ शकतो. त्यांचा व्यास 5 मायक्रोमीटरपेक्षाही कमी असतो. आम्ही काही श्‍वासांमधूनच विषाणूच्या जेनेटिक कॉम्पोनंट आरएनएचा छडा लावण्यात यशस्वी ठरलो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT