कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनसोबत चर्चेची तयारी दर्शविताना घातलेली शरणागती तसेच सत्तांतराची अट धुडकावून लावताना घुसखोरांसमोर आम्ही नांगी टाकणार नाही, प्रसंगी मृत्यू पत्करू; पण कुठल्याही परिस्थितीत झुकणार नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की (Russia Ukraine war) यांनी युद्धाच्या तिसर्या दिवशी शनिवारी रशियाला ठणकावले.
राजधानी कीव्हवर शनिवारी रशियाने पुन्हा हल्ले चढविले. यामुळे दोन्हीकडील सैन्यात कीव्हमधील रस्त्यांवर तुंबळ युद्ध सुरू आहे. अनेक रहिवासी इमारती या हल्ल्यांत उद्ध्वस्त झाल्या. रशियाने मेलिटोपोल शहरावरही कब्जा जमविला. शनिवारी रशियन फौजा कीव्हपासून फक्त 18 किलोमीटरवर होत्या. युक्रेनमधील फौजांना सर्व दिशांनी हल्ला चढवण्याचे आदेश रशियाने दिले आहेत.
रात्र वैर्याची आहे. ते कधीही राजधानी कीव्हवर तुटून पडू शकतात. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे आपण जाणतो. युक्रेनचे भवितव्य पणाला लागले असून, लढण्यासाठी सज्ज राहा, अशी हाकदेखील झेलेन्स्की यांनी दिली. झेलेन्स्की पळून गेल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या फेटाळत झेलेन्स्की यांनी खास व्हिडीओ जारी करत सांगितले की, मी कुठेही गेलेलो नाही. मी अखेरच्या क्षणापर्यंत इथेच असेन.
निर्वासितांचे तांडे
एकीकडे असंख्य युक्रेनियन युद्धाच्या भीतीने देश सोडून पळाले असून, ही संख्या दोन दिवसांत लाखावर पोहोचली आहे. निर्वासितांचे हे तांडे खासकरून पोलंड आणि मोल्डोवामध्ये पोहोचले. बाहेर देशात वास्तव्याला असलेले अनेक युक्रेनियन मात्र कीव्हमध्ये केवळ देशासाठी लढण्याकरता परतल्याचेही चित्र आहे.
मोदींना साकडे
सुरक्षा परिषदेत झालेल्या मतदानात भारत तटस्थ राहिल्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा फोन केला. आम्हाला सुरक्षा परिषदेत राजकीय मदत करा, असे साकडे त्यांनी मोदींना घातले. मोदींशी काय बोलणे झाले हे झेलेन्स्की यांनी ट्विटरवर सांगितले. ते म्हणतात, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत मागितली. एक लाख घुसखोर आमच्या देशात घुसले आहेत. आमच्या घरांवर, शहरांवर घुसखोरांनी ताबा घेतलेला आहे.
आमच्या नागरी वस्त्या धगधगत आहेत. या कठीण प्रसंगात तुम्ही राजकीय आणि इतर सर्व प्रकारची शक्य ती मदत आम्हाला करावी. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत आपण आमची बाजू घ्यावी. आपण सर्वांनी मिळून या हल्ल्याचा मुकाबला करायला हवा.
तटस्थ भारताने कान उपटले (Russia Ukraine war)
तत्पूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरुद्ध निषेध प्रस्ताव पारित झाला असून, प्रस्तावाच्या बाजून 11 तर विरोधात केवळ 1 मत पडले. भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीने मतदानात सहभाग घेतला नाही. तथापि, रशियाने व्हेटो पॉवरचा वापर करून निषेध प्रस्ताव रद्दबातल ठरवला. या प्रस्तावावरील मतदानात भारत तटस्थ राहिला. मतदान न करण्याचे स्पष्टीकरण देताना भारताने युक्रेनमधील रक्तपाताबद्दल चिंता व्यक्त केली आणि या युद्धात चर्चेचा मार्गच जग विसरले, अशा शब्दांत रशियासह पाश्चात्य देशांचेही भारताने कान टोचले.
युद्ध धोकादायक वळणावर
'न्यूयॉर्क टाईम्स' या इंग्रजी दैनिकाने आपल्या अद्ययावत वृत्तात, युक्रेनच्या सागरी हद्दीत आलेल्या एका जपानी जहाजावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे म्हटले आहे. जहाजाच्या एका भागात आग लागलेली आहे. जहाज 'टग' करून दुरुस्तीसाठी तुर्कस्तानात नेण्यात येत आहे. अमेरिका आणि नाटो फौजांनी प्रत्यक्ष युद्धात भाग घेतल्यास रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे अण्वस्त्रे वापरतील, अशी शक्यता अमेरिकन लष्करी अधिकार्याच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने व्यक्त केली आहे.
नाटो युद्धात उतरणार?
युक्रेनची राजधानी आता पडण्याच्या मार्गावर असली तरी कोणताही देश युक्रेनच्या बाजूने अद्याप या युद्धात उतरलेला नाही. नॉर्थ अॅटलांन्टिक ट्रिटी ऑर्गनायझेशन तथा नाटोचा युक्रेन सदस्य नाही. मात्र, नाटोच्या सर्वच सदस्य देशांनी युक्रेनला दिलेला पाठिंबा तूर्तास बाहेरून आहे आणि ते रशियावर दबाव टाकू लागले आहेत.
नाटो सदस्य असलेल्या रोमानियापाठोपाठ जपानच्या जहाजावर केलेला हल्ला रशियाला भोवणार अशी चिन्हे असून, मित्र राष्ट्रांनी (नाटो) रशियाविरुद्ध भूमिका अधिक कणखर केली आहे. युक्रेननेही जगातील 28 देश आपल्या बाजूने असल्याचा दावा केला आहे. फ्रान्सने रशियाचे मालवाहू जहाज जप्त करून जपानसह फ्रान्सनेही रशियाविरुद्ध एकप्रकारे यल्गारच केला आहे.
आम्ही युक्रेनची 800 लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. यात 14 लष्करी हवाई तळे, 19 कमांड पोस्ट, 24 एस-300 अँटी-एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम' आणि 48 रडार स्टेशन्सचा समावेश आहे, असे रशियाने युद्धाच्या तिसर्या दिवशी अधिकृतपणे जाहीर केले. युक्रेन नौसेनेची 8 जहाजेही रशियाने उद्ध्वस्त केली आहेत. युक्रेनने 3500 रशियन सैनिकांना ठार केल्याचा दावा केला. रशियाचे 2 रणगाडे, 14 विमाने आणि 8 हेलिकॉप्टर्स आम्ही पाडल्याचेही युक्रेनतर्फे सांगण्यात आले.
फ्रान्सचा रशियन जहाजावर कब्जा
रशिया-युक्रेन युद्धाची धग आत अन्य देशांपर्यंत पोहोचू लागली आहे. शनिवारी फ्रान्सच्या नौदलाने ब्रिटिश खाडीतून रशियाचे एक मालवाहू जहाज ताब्यात घेतले. फ्रान्सच्या या कारवाईने रशिया भडकलेला असून, फ्रान्समधील रशियन राजदूताने तशी भावना इमॅन्युएल मॅक्राँ सरकारला कळविली.
अमेरिकेकडून 600 दशलक्ष डॉलर
अमेरिकेने रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनला 600 दशलक्ष डॉलरचे संरक्षण सहकार्य करण्याची घोषणा केली. फ्रान्सनेही संरक्षणाची उपकरणे युक्रेनला रवाना केली असून, प्रत्यक्ष फौजा पाठवण्याबद्दल मात्र मौन पाळले आहे. जपानसारखा आर्थिक महासत्ता असलेला देश अद्याप रशियावर निर्बंध टाकण्याचा निर्णय घेऊ शकलेला नाही.