मोहोळ (जि.सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव झुगारुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचे आदेश दिले. यामुळे आता रशिया – युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) युद्धाचा भडका उडला आहे. युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकले आहेत.
युक्रेनमध्ये युद्धजन्य ठिकाणापासून शंभर किलोमीटर वरील परिसरात मोहोळ (जि. सोलापूर) येथील शिवम हरिदास सावंत याने दैनिक 'पुढारी' शी बातचीत केली. तो म्हणाला, युद्धजन्य ठिकाणापासून मी जवळच राहत आहे. येथे मला खूप भीती वाटत असून रात्रभर झोप लागत नाही. तसेच भारतीय दूतावासाकडून कोणतीही थेट मदत अद्याप पर्यंत मिळाली नाही.
तसेच, मोहोळ येथील शिवम हरिदास सावंत हा विद्यार्थी युक्रेन देशातील डिंप्रो मेडिकल स्टेट युनिव्हर्सिटी येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्याने भारतातील विद्यार्थी मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना विमानाचे तिकीट मिळाले हाेते. परंतु विमान सेवा रद्द झाल्याने शिवम सावंत हा युक्रेन मध्येच अडकून राहिला आहे.
सध्या तो डिंप्रो मेडिकल स्टेट युनिव्हर्सिटी युक्रेनच्या वस्तीगृहात वास्तव्य करत आहे. त्यांच्या कॉलेज व हॉस्टेलजवळ बंकर उभा करण्यात आला आहे. सायरन वाजला की सर्व विद्यार्थ्यांनी बंकर मध्ये जावे अश्या सूचना भारतीय दूतावासाकडून वेबसाईट द्वारे देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काल रात्रीपासून या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, तसेच किराणामाल व एटीएम मधून पैसे काढण्यासाठी देखील बाहेर जाता येत नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. भारतीय दूतावासांकडून या विद्यार्थ्यांना थेट संपर्क होत नसून केवळ वेबसाईटवरच सूचना मिळत आहेत. शिवम सावंत राहत असलेल्या हॉस्टेल पासून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सीमा बंद केल्याने कोणत्याही वाहनातून दुसरीकडे जाणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे भारतीय राजदूतांनी विद्यार्थ्यांना बसद्वारे अन्य सुरक्षित ठिकाणी घेवून जावे आणि तेथून भारतात आणण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा