पृथ्वीचा शेजारचा ग्रह म्हणजे मंगळ. या लाल ग्रहाबाबत संशोधकांना नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ, कठीण पृष्ठभूमीचा ग्रह आहे. एकेकाळी मंगळावर वाहते पाणीही होते. मात्र, सध्या त्याचे बदललेले रूप दिसते. भविष्यात मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न एलन मस्क यांच्यासारखे अनेक लोक पाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या ग्रहाविषयीची ही रंजक माहिती...
सौरमंडळातील सूर्यापासूनचा चौथा ग्रह म्हणजे मंगळ. हा एक धुळीने भरलेला, थंड आणि वाळवंटी असा ग्रह आहे. या ग्रहावरही ऋतुचक्र असते. ग्रहाच्या ध्रुवीय भागांमध्ये बर्फ असण्याची शक्यता संशोधकांना वाटते. मंगळावर निष्क्रिय ज्वालामुखी आणि दर्या, विवरे आहेत. या ग्रहावर सध्या मानवाने पाठवलेली अनेक रोव्हर फिरत असून, त्याच्याभोवती अनेक देशांचे ऑर्बिटरही फिरत आहेत. त्यामध्ये भारताच्या ‘मंगळयाना’चाही समावेश आहे.
सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर भीषण महापूर आला होता. मात्र, हे पाणी कुठून आले, किती काळ राहिले व कुठे गेले याची अद्यापही कुणाला माहिती नाही. मंगळावरील दरी ही पृथ्वीवरील सर्वात मोठ्या दर्यांपेक्षाही अनेक पटीने मोठी आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर धुळीची वादळे निर्माण होत असतात. मंगळाच्या वातावरणातील दाब पृथ्वीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे तिथे जीवसृष्टीची शक्यता कमी आहे.
मंगळाला ‘मार्स’ हे इंग्रजी नाव रोमन युद्धदेवतेच्या नावावरून देण्यात आले आहे. मंगळाचा लाल रंग रक्ताच्या रंगाशी मिळताजुळता आहे. इजिप्तचे लोक त्याला ‘हर डेसर’ म्हणत असत, त्याचाही अर्थ ‘लाल’ असा होतो. मंगळाच्या मातीमध्ये लोह खनिज अधिक असल्याने त्याला असा लाल रंग मिळाला आहे.
मंगळाबाबत सातत्याने जगभरातील अनेक स्पेस एजन्सीज संशोधन करीत असतात. तिथे जीवसृष्टी आहे का, एकेकाळी तिचे अस्तित्व होते का, हे यामधून तपासले जात आहे. लाखो वर्षांपूर्वी मंगळावर योग्य तापमान व वाहते पाणी होते. त्यामुळे तिथे सूक्ष्म जीवांच्या रूपाने का होईना जीवसृष्टी अस्तित्वात असावी, असे संशोधकांना वाटते. 3390 किलोमीटरची त्रिज्या असलेला मंगळ पृथ्वीच्या आकाराच्या निम्मा आहे. सूर्याच्या प्रकाशाला मंगळापर्यंत पोहोचण्यासाठी तेरा मिनिटे लागतात.
आपल्या ग्रहमालिकेतील सर्व ग्रहांप्रमाणे मंगळही विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. सूर्याभोवतीची ही प्रदक्षिणा 687 दिवसांमध्ये पूर्ण करतो. याचा अर्थ पृथ्वीवरील 23 महिन्यांइतके त्याच्यावरील वर्ष असते.
सर्व काही सुरळीत झाले, तर येत्या दहा वर्षांमध्येच अंतराळवीर मंगळ मोहिमेवर जाऊ शकतील. ‘नासा’च्या योजनेत अंतराळवीर मंगळावर उतरवणे, मंगळाची परिक्रमा आणि त्यांना पुन्हा पृथ्वीवर परत आणणे, या गोष्टींचा समावेश आहे. भारताने 5 नोव्हेंबर 2013 मध्ये मंगळयान पाठवले होते.