वॉशिंग्टन :
203 दिवसांची अतिशय आव्हानात्मक अंतराळ मोहीम. या काळात सहा चाकांच्या रोबोटिक रोव्हरने सात महिन्यांमध्ये 47 कोटी किलोमीटरचा प्रवास केला. श्वास रोखणारा क्षण त्यावेळी आला ज्यावेळी 'नासा'चे 'पर्सिव्हरन्स रोव्हर' मंगळभूमीवर उतरणार होते. शेवटच्या सात मिनिटांमध्ये त्याचा वेग शून्यावर आणायचा होता. त्यानंतर सेफ लँडिंग गरजेचे होते. अखेर सर्व काही सुरळीतपणे पार पडले आणि त्याचे श्रेय भारतीय वंशाची अमेरिकन संशोधक महिला डॉ. स्वाती मोहन यांना देण्यात आले.
स्वाती या अमेरिकेत राहत असल्या आणि 'नासा'साठी काम करीत असल्या तरी त्यांचे भारतीयत्व अबाधित आहे. पर्सिव्हरन्सच्या यशस्वी लँडिंगनंतर त्या 'नासा टीव्ही'बरोबर संवाद साधत होत्या त्यावेळी त्यांच्या कपाळावरील टिकली चमकत होती. मंगळाच्या जवळ पोहोचणे तसे सोपे ठरू शकते; पण रोव्हरला मंगळभूमीवर लँड करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. बहुतांश मोहिमा यामध्ये असफल ठरतात. पर्सिव्हरन्स रोव्हर शेवटच्या सात मिनिटांमध्ये ताशी 12 हजार मैल इतक्या प्रचंड वेगावरून शून्य वेगापर्यंत पोहोचले व मग त्याचे यशस्वी लँडिंग झाले. वेग शून्यावर आणून रोव्हरला अलगदपणे जमिनीवर उतरवणे हे सोपे काम नव्हते व ते स्वाती आणि त्यांच्या टीमने करून दाखवले.
स्वाती केवळ एक वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांचे आई-वडील अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांच्या आयुष्याचा बहुतांश काळ नॉर्दन व्हर्जिनियामध्ये गेला आहे. त्या नऊ वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा स्ट्रार ट्रेक सीरिज पाहिली होती. त्यावेळीच त्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करण्याचे ठरवले होते. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल आणि एअरोस्पेसमध्ये इंजिनिअरिग केले आणि नंतर पीएच.डी.ही केली. 'पर्सिव्हरन्स' रोव्हरच्या कामाशी त्या सुरुवातीपासूनच जोडल्या गेलेल्या आहेत. पासाडेनामध्ये 'नासा'च्या जेट प्रॉपल्शन यूनिटमध्ये त्यांनी बराच काळ व्यतीत केला आहे. 'नासा'च्या शनी मोहिमेतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.