न्यूयॉर्क : मंगळ ग्रह सध्या पूर्णपणे कोरडा दिसतो. मात्र, या लालग्रहावरील जीवनाचे संकेत शोधणार्या मोहिमांमधून अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती मिळत आहे. यामुळे या ग्रहाच्या इतिहासाबाबतचे काही महत्त्वाचे संकेतही मिळाले आहेत. असेच काही संकेत 'नासा'च्या क्यूरिऑसिटी रोव्हरने डाटाच्या माध्यमातून दिले आहेत.
मंगळासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनानुसार मंगळावर कधीकाळी दीर्घकाळ पाणी असावयाचे आणि त्यानंतर हा ग्रह पुन्हा दीर्घकाळ कोरडा व्हावयाचा. मंगळावरील पर्वत आणि दर्यांच्या निर्मितीच्या माध्यमामधून हे संकेत मिळाले आहेत. चेमकॅम इन्स्ट्रूमेंट आणि टेलिस्कोपच्या मदतीने मंगळावरील पर्वत व दर्यांबाबत संशोधन केले आहे.
'नासा'चा क्यूरिऑसिटी रोव्हर सध्या मंगळावरील गेल क्रेटर भागातील इलॉईस मॉन्स नामक पर्वतावर आहे. या भागातील डाटा या रोव्हरने पाठविला आहे. या डाटाचे विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी अशी शक्यता व्यक्त केली आहे की, मंगळाच्या शंभर फूट धुळीने बनलेल्या थराच्या खालील थर सातत्याने बदलत असतो. वादळामुळे वाळूचे पर्वतही आपली जागा वारंवार बदलत असतात. कोरडे वातावरण असताना हे वाळूचे पर्वत तयार झाले; पण त्याखालील थराची निर्मिती पाहता तेथे एकेकाळी सरोवर, नद्या व किनारे असल्यासारखे वाटते. कधी काळी गेल क्रेटरमध्ये पाण्याने भरलेला असणार. आता मात्र तो पूर्णपणे कोरडा आहे.