Latest

विद्याधर अनास्कर, “देशपातळीवर राष्ट्रीय सहकार धोरणाची आवश्यकता”

backup backup

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सहकारी बँकिंग, सहकारी हाऊसिंग, सहकारी शुगर आणि सहकार मार्केटिंग असे स्वतंत्र विभाग करुन त्यांच्या प्रश्नांवरील उपाययोजनांसाठी आवश्यक ते बदल सहकार कायद्यात व्हायला हवेत. एवढेच नाहीतर खाजगी बँकांकडील ग्राहक सहकारी बँकिंगमध्ये आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय सहकार धोरण आणण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी येथे व्यक्त केले.

आयएसएससीच्या वतीने सहकार सक्षमीकरण आणि युवकांचा सहभाग या विषयावरील 36 व्या राष्ट्रीय संशोधन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ज्ञानेश्वर सभागृहात शुक्रवारी दुपारी पार पडली. दोन दिवस चालणार्‍या या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन को-ऑपरेशनचे  (आयएसएससी) चेअरमन घनश्यामभाई अमिन हे होते.

यावेळी राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष आणि इफ्कोचे अध्यक्ष दिलीपभाई संघानी, माजी सनदी अधिकारी डॉ. सुधीरकुमार गोयल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितिन करमळकर, वैकुंठ मेहता राष्ट्रीय संस्थेच्या संचालिका डॉ हेमा यादव, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अध्यासनचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर, पी.बी. कोकरे, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड सुभाष मोहिते, विद्याधर अनास्कर. तसेच अन्य राज्यातील विद्यार्थी उपस्थित होते.

सहकारातून समृद्धीकडे हे तत्व प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात आणण्यासाठी त्यामध्ये युवकांचा अधिकाधिक सहभाग असला पाहिजे, असे नमूद करुन अनास्कर म्हणाले की, "केंद्राने पंचवार्षिक योजनेत सुरूवातीला सहकाराचा समावेश केला होता. पण आजकाल अर्थसंकल्पातही सहकारावर फारसे भाष्य केले जात नाही. एकाच प्रकारचे ध्येय असणाऱ्या व्यक्ती विकासासाठी प्रयत्न करतात, हे सहकार क्षेत्राचे मूलतत्व आहे. परंतु सहकारातून वैयक्तिक समृद्धीकडे जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. म्हणून समृध्दीसाठी सहकाराला पकडणे योग्य नाही."

अध्यक्षपदावरुन बोलताना आयएसएससीचे चेअरमन घनश्यामभाई अमिन म्हणाले की, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या 112 देशांमध्ये सहकार चळवळीत भारताचे अग्रस्थान आहे. मात्र, या क्षेत्रात आपण सर्व आघाड्यांवर आहोत असे चित्र नसून सुधारणांना भरपूर वाव आहे. त्यासाठी शासनाचे धोरण आखून त्यांची अंमलबजावणी केल्यास सहकार क्षेत्र आणखी बळकट होईल. तसेच महिला आणि तरुणांचा सहभाग या क्षेत्रात वाढणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष दिलीपभाई संघानी म्हणाले की, देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे.महिला वर्गासह तरुणांना सहकार क्षेत्राकडे आकृष्ट करण्यासाठी नव्याने योजना आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठे आणि वैमनिकॉमने एकत्र येऊन काम करायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, युवकांचे सहकार क्षेत्रामध्ये योगदान वाढण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. त्यासाठी येत्या काही वर्षांमध्ये सहकार विषयक अनेक उपक्रम आणि सहकार अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये शिकवला जाणार आहे. प्रा.तापकिर यांनी स्वागत, संजीव खडके यांनी आभार तर प्रा. अनिल कारंजकर यांनी सूत्र संचालन केले .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT