पुढारी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात उद्यापासून म्हणजे १३ ते १६ मार्च या कालावधीतअवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज (IMD Rainfall Alert) हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही भागांसह गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनाही अवकळी पावसाचा फटका बसणार आहे.
राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ मार्च ते १६ मार्च दरम्यान ढगांच्या गडगडाटांसह हलका पाऊस पडेल. १४ ते १६ मार्च दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भासह, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील गडगडाटांसह हलका पावसाची शक्यता आहे, (IMD Rainfall Alert) असे हवामान विभागाने म्हटले आहे. १२ ते १४ मार्च दरम्यान गुजरातमध्ये तर १४ ते १६ मार्च दरम्यान पश्चिम मध्य प्रदेशमध्येही वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह हलका पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व गुजरात, ओडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्येही १५ ते १७ मार्च दरम्यान हलका पाऊस (IMD Rainfall Alert) पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.