नगर : अवकाळीने दाणादाण ! शेतकरी संकटात; गहू, हरभरा पिके, फळबागांचे आतोनात नुकसान | पुढारी

नगर : अवकाळीने दाणादाण ! शेतकरी संकटात; गहू, हरभरा पिके, फळबागांचे आतोनात नुकसान

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात उभ्या गहू, हरभर्‍यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर वादळी वार्‍यासह पडलेल्या गारांनी फळबागांचेही नुकसान झाले. काढणीला आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले, तर आंबा मोहर गळून पडला आहे. जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव, साकत(जामखेड), वाळकी, सोनई परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यावर असमानी संकट कोसळले. कापूस व सोयाबीनचे नुकसान भरपाई आलेली नसतानाही पुन्हा पावसाने झोडपले.

शेवगावात पिके भुईसपाट

शेवगाव तालुका : अवकाळी पावसाने तालुक्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, गहू, कांदा, ज्वारी, उन्हाळी बाजरी, चारा पिके भुईसपाट झाली आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम आदमी पार्टीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केलीे. सोमवारी रात्री वादळी पाऊस बरसला. मंगळवारी सकाळी पुन्हा गडद ढगाळ वातावरणात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला. चार-पाच तास अधून-मधून झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले त्यात धुलीवंदनचा आनंद हिरावला.

विजांच्या कडकडात झालेल्या पावसाने शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ केली. काढलेले गहू काही हरभरा पीक भिजले. कर्‍हेटाकळी भागात अनेक क्षेत्रातील उभा गहू वादळाने भुईसपाट झाला. अनेक शेतकर्‍यांचे गव्हांचे पीक शेतात उभे आहे. काही काढणीला आले तर काही पिकांची मळणी होणे बाकी असताना अचनाक वादळी पाऊस आल्याने उभे पीक भुईसपाट झाले. काढणी, मळणीत असलेल्या गव्हाचा रंग गेला. कांदा पीक भिजल्याने त्याचा जोम नाहिसा झाला, ज्वारी, उन्हाळी बाजरी, मका पिके आडवी पडली आहेत. आता या पिकांच्या उत्पन्नात घट होणार असून, बाजारभाव पडणार आहेत. वादळाने जमिनीवर पसरलेल्या पिकांचे पुरते नुकसान होणार आहे. कपाशी, कांद्याला भाव नसल्याने रडकुंडीला आलेला शेतकरी पुन्हा अवकाळी पावसाने अडचणीत सापडला आहे.
अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करुन मदत देण्याचे मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टीने दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, दत्तात्रय फुंदे, रामेश्वर शेळके, अमोल देवढे, तसेच आम आदमीचे शरद शिंदे, दादा बोडखे, आनंद गांधी, संतोष दारकुंडे उपस्थित होते.

भोरवाडीमध्ये गारपीट; वादळाने फळबागांचे नुकसान

पूर्वीच्या पावसाने नुकसान झाल्याची भरपाई अजूनही शेतकर्‍यांच्या हाती पडली नाही. त्यातच शेतीमालाचे भाव पडल्याने संकटातील शेतकर्‍यांना होळीच्या दिवशी वादळी वार्‍यासह गारपीट झाल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने कांदा, गहू, हरभरा, वाटाणा, मका यांच्यासह फळबागांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा पिकांना झाकण्यासाठी शेतकर्‍यांची चांगलीच धांदल उडाली. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होेते.

सायंकाळी अचानक वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट होऊन वाळकी, गुंडेगाव परिसरात पाऊस, तर भोरवाडी परिसरात गारपीट झाली. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाळकीसह गुंडेगाव परिसरात सध्या गहू कापणी व हरभरा काढणी सुरू आहे. कापणी झालेला गहू आणि काढलेला हरभरा शेतातच आहे. अनेक ठिकाणी गव्हाची पिके पावसाने भिजल्याने पिकांचे नुकसान झाले. ढगाळ वातावरणाने संत्रा, मोसंबी, डाळिंब आदी फळबागांना फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. भोरवाडी परिसरात गारांचा वर्षाव झाल्याने शेतातील काढणी झालेल्या पिकांसह उभी पिके झोडपली आहेत.

नेवाशात रब्बी पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत

तालुक्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान होऊन शेतकर्‍यांची दाणादाण उडाली. गहू पिकाचे मोठे नुकसान केले. विविध संकटांनी शेतकरी बेजार असतानाच सोमवारी रात्री अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान केल्याने शेतकर्‍यांची झोप उडवली आहे. सोमवारी रात्री 7 वाजता वादळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. सर्वत्र होळीचा उत्सव साजरा होत असताना विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारे सुरू झाले. त्यामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली. शेतात मळणीसाठी गोळा करून ठेवलेला हरभरा व गहू वार्‍याने उडाला. कापणी केेलेला गहू व हरभरा झाकण्यासाठी धावपळ उडाली. काढणीला आलेल्या गव्हू भुईसपाट झाला.

तालुक्यातील चांदा, बर्‍हाणपूर परिसरात अवकाळीचा जोरदार तडाखा बसला आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान जोरदार वादळासह अवकाळी पाऊस परिसरात सुरू झाला. विजांच्या कडकडाटात चांदा व घोडेगाव, दिघी, सलाबतपूर परिसरात गाराही पडल्या तर चांदा, लोहारवाडी रस्त्यावर भालके वस्तीवरील संजय अण्णासाहेब भालके यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. मात्र, कुठलीही जीवितहानी झाली नाही. या पावसाने परिसरात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून, काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा व इतर नकदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

नेवाशासह खडका, मुकिंदपूर, मक्तापुर, गोंडेगाव, खलालप्रिंपी, मडकी, म्हसले, सलाबतपूर, पिचडगाव, सोनई, घोडेगाव, शिरेगाव, करजगाव, पानेगाव, माका परिसरात विजांच्या कडकडाटासह सोमवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कांदा, गहू व हरभरा पिकांची वाताहत झाली. नेवासा बुद्रुक परिसरात गव्हाचे पीक झोपले आहे. यंदा गव्हाचे पीक जोमदार आले होते.अवकाळीने गव्हाच्या पिकांची वाट लागली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

 

 

Back to top button