पानशेत खोर्‍याला अवकाळीने झोडपले; आंबाबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

पानशेत खोर्‍याला अवकाळीने झोडपले; आंबाबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड, पानशेत खोऱ्यासह पश्चिम हवेली तालुक्याला लागोपाठ दोन दिवस जोरदार वादळी पावसाने झोडपले. या पावसाने आंबाबागांसह काढणीस आलेल्या व शेतात कापणी करून ठेवलेल्या गहू, हरभरा, वाटाणा आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. पुढील पाच-सहा दिवस आणखी वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज असल्याने कृषी विभागाने फळबागांसह पिकांच्या नुकसानीच्या पाहणीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. 7) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सिंहगड, खानापूर, खामगाव, मावळ, मोरवाडी भागांत जोरदार वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला.

तसेच मांगदरी, आंबणे, तोरणा, पानशेत, निगडे, मोसे, ओसाडे परिसरात पावसाने अर्धा-पाऊण तास धुमाकूळ घातला. काल (दि. 6) होळीच्या दिवशी मध्यरात्री व त्यानंतर आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस पडला. लागोपाठच्या पावसामुळे शेतकर्‍यांना कापणी केलेली शेतातील पिकेही घरात आणता आली नाहीत.

आंब्यासह इतर फळबागांनाही मोठा फटका बसला. मोहर गळाला असून, कैर्‍या पडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे मोगरवाडी येथील शेतकरी लक्ष्मण दारवटकर यांनी सांगितले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बाधित शेतकर्‍यांच्या वतीने पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी मांगडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

येत्या पाच-सहा दिवसांत वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज आहे. शेतकर्‍यांनी पिकांचे तसेच फळबागांचे योग्य पध्दतीने संरक्षण करावे, असे आवाहन हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे. तसेच अवकाळी पावसाच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश स्थानिक कृषी सहायक, मंडल कृषी अधिकार्‍यांना दिल्याचेही साळे यांनी सांगितले.

Back to top button