वर्धा : अवकाळी पावसाने ८६ हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज | पुढारी

वर्धा : अवकाळी पावसाने ८६ हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात धुलीवंदनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास विविध भागात अवकाळी पाऊस, हवेमुळे विविध ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. देवळी तसेच कारंजा (घाडगे) तालुक्याला याचा जबर फटका बसला आहे. यामध्ये ८६ हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज असून अंतिम सर्वेक्षणात नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास वीजांचा कडकडाट, वार्‍यासह काही भागात पाऊस झाला. अवकाळी पावसाने संत्रा, गहू, चणा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संत्राची फळ गळती होवून गहू जमिनदोस्त झाला. चणाच्या गंज्या काही ठिकाणी भिजल्या होत्या. कारंजा (घाडगे) तालुक्यात संत्राला जास्त फटका बसला. देवळी तालुक्यातही काही गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले.

अवकाळी पाऊस, वादळाने ८५.८ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. देवळी तालुक्यात सहा गावांत १८.८० हेक्टरवर तर कारंजा तालुक्यात २३ गावांत ६७ हेक्टर असे २९ गावात ८५.८ हेक्टरवर नुकसानीचा अंदाज आहे. नुकसानीच्या अंतिम सर्वेक्षणाला प्रशासनाकडून सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : 

Back to top button