Latest

Monkeypox : संकट संपेना! अमेरिकेत सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण, जाणून घ्या याची लक्षणे

दीपक दि. भांदिगरे

पुढारी डेस्क

कोरोना पाठापोठ आता आणखी एका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेत मंकीपॉक्स (monkeypox) विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आलाय. एका पुरुषाला याची लागण झाली आहे. तो नुकताच कॅनडातून अमेरिकेत प्रवास करुन आलेला आहे, अशी माहिती युरोपियन आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कॅनडाच्या क्यूबेक प्रांतात मंकीपॉक्सचे (monkeypox) एक डझनाहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. येथील आरोग्य अधिकारी मंकीपॉक्सच्या प्रकरणांची अधिक तपासणी करत आहेत. आता अमेरिकेत अशाप्रकारचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा एक दुर्मीळ पण गंभीर स्वरुपाचा विषाणू आहे. असे वृत्त CBCने दिले आहे.

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या माहितीनुसार, चेहऱ्यावर आणि शरीरावर चिकनपॉक्स सारखे पुरळ येण्याआधी ताप, स्नायू दुखणे आदी फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात. कॅनडामधील मॉन्ट्रियलच्या क्यूबेक शहरातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी मंकीपॉक्सच्या १३ प्रकरणांची तपासणी करत आहेत. लैंगिक संक्रमण आणि रक्तजन्य संक्रमणावर उपचार करणाऱ्या अनेक क्लिनिकमध्ये याचे निदान झाले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही मंकीपॉक्स प्रकरणांची पुष्टी होण्याची शक्यता आहे, असे सीबीसीने वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, शेजारील अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्सचे आरोग्य अधिकारी आणि सीडीसीने (Massachusetts health authorities and the CDC) बुधवारी मंकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केली. "बाधित रुग्णामुळे इतर लोकांना कोणताही धोका नाही आणि सदर रुग्ण रुग्णालयात दाखल आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे." असे मॅसॅच्युसेट्स डिपार्टमेंट ऑफ हेल्थने एका निवेदनात म्हटले आहे.
सीडीसीच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या शरिरातील द्रव अथवा पुरळ, कपडे आणि बिछाना या माध्यमातून पसरू शकतो. पण घरी असलेले जंतुनाशक हा विषाणू नष्ट करू शकतात.

गेल्या दोन आठवड्यांत पोर्तुगाल, स्पेन आणि ब्रिटनमध्ये असे रुग्ण आढ‍ळून आले आहेत. जिथे मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव असामान्य आहे. विशेषतः लैंगिक संबंधाच्या माध्यमातून तो उद्भवत आहे, असे सीडीसीचे पॉक्सव्हायरस तज्ज्ञ इंगर डॅमन यांनी म्हटले आहे.

युरोपात मंकीपॉक्सची प्रकरणे समलिंगी संबंध (men who have sex with men) ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये अधिक आढळून आली आहेत. ब्रिटनमध्ये ६ मे पासून मंकीपॉक्सचे ९ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सी (UKHSA) ने बुधवारी दिली.

स्पेन आणि पोर्तुगालनेदेखील जाहीर केले आहे की मंकीपॉक्सचे ४० हून अधिक संशयित आणि निदान झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT