वैज्ञानिकांनी समुद्रात शोधले 5500 नवे विषाणू | पुढारी

वैज्ञानिकांनी समुद्रात शोधले 5500 नवे विषाणू

वॉशिंग्टन : अवघ्या जगाची गेली दोन वर्षे कोरोना विषाणूशी झुंजण्यातच गेली. विषाणू आणि जीवाणू या सूक्ष्म जीवांची दुनिया बरीच मोठी आहे आणि त्यांच्या नव्या नव्या प्रकारांचा सातत्याने शोधही लावला जात असतो. आता वैज्ञानिकांनी समुद्रात 5500 नव्या विषाणूंना शोधले आहे. अमेरिकेच्या ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की कोरोनाप्रमाणे हे सर्व ‘आरएनए व्हायरस’ आहेत. हे सर्व नवे विषाणू भारताजवळील अरबी समुद्र तसेच हिंदी महासागराच्या वायव्य भागातील आहेत.

‘सायन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. विषाणू शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी जगभरातील सर्व समुद्रांच्या 121 परिसरांमधील पाण्याचे 35 हजार नमुने गोळा केले होते. तपासणीमध्ये सुमारे 5500 नव्या आरएनए विषाणूंचा शोध लागला. हे विषाणू सध्याच्या पाच प्रजाती व नव्या पाच प्रजातींमधील आहेत. संशोधक मॅथ्यू सुलिवान यांनी सांगितले की या नमुन्यांच्या अभ्यासातून हे दिसून आले आहे की नव्या विषाणूंची संख्या अतिशय कमी आहे.

भविष्यात लाखोंच्या संख्येने विषाणू मिळण्याची शक्यताही आहे. हे संशोधन खास आरएनए व्हायरसबाबत झाले. याचे कारण म्हणजे डीएनए व्हायरसच्या तुलनेत त्यांचा कमी अभ्यास झालेला आहे. कोरोना, एन्फ्ल्युएन्झा, इबोलासारख्या आरएनए विषाणूंनीच जगाला संकटात टाकलेले आहे. त्यामुळे भविष्यात नव्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आधीपासूनच तयार राहिले पाहिजे.

या संशोधनात टाराविरिकोटा, पोमीविरिकोटा, पॅराजेनोविरिकोटा, वामोविरिकोटा आणि आर्कटिविरिकोटा नावाच्या पाच नव्या विषाणु प्रजाती सापडल्या. त्यापैकी टाराविरिकोटा प्रजाती जगातील सर्व समुद्रांमध्ये सापडली आहे. आर्कटिविरिकोटा ही प्रजाती आर्क्टिक महासागरात आढळली. सर्व आरएनए व्हायरसमध्ये ‘आरडीआरपी’ नावाचे प्राचीन जनुक आढळले आहे. हे जनुक अब्जावधी वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते.

Back to top button