धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे तालुक्यातील अंबोडे शिवारात झालेल्या खुनाचे (Murder) गूढ उकलण्यात तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. हा खून मयताच्या पुतण्यानेच केल्याची बाब पुढे आली असून मारेकऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.
धुळे तालुक्यातील अंबोडे शिवारामध्ये पाटील यांनी शेतीच्या मशागतीसाठी बांधावर असलेल्या गवतास आग लावली. ही आग विजल्यानंतर बांधावर जळालेल्या स्थितीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती कळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप महीराळे आणि तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन कार्यवाही सुरू केली. यात मयत व्यक्ती हा अमळनेर तालुक्यातील रणाईचे तांडा येथे राहणारा ज्ञानेश्वर रामभाऊ राठोड (25) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या पोटावर, पाठीवर आणि तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याचा खून केल्याची बाब निष्पन्न झाल्याने तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा खून उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीस पथकासमोर होते.
अखेर पोलीस पथकाने मयताचा पुतण्या जगदीश बबलू राठोड याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने हा खून केल्याची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या कारणावरून हा खून झाल्याची बाब पोलिस पथकाच्या लक्षात आली. आरोपी जगदीश राठोड याने मयत ज्ञानेश्वर राठोड याला दुचाकीने आंबोडे शिवारात आणले. यानंतर त्याला धारदार शस्त्राने वार करून शेताच्या बांधावर टाकून दिले. हा खून झाल्यानंतर आरोपीने पलायन केले होते. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महीराळे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केलेल्या सूत्रबद्ध तपासा मुळे अवघ्या चोवीस तासांमध्ये आरोपी हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हा खून उघडकीस आल्यामुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.