श्रीरामपुरात रंगणार तिरंगी लढत..?

श्रीरामपुरात रंगणार तिरंगी लढत..?
Published on
Updated on

श्रीरामपूर :

श्रीरामपुरात गेल्या पंच वार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी 4 गट, तर 8 गण होते. आता नव्या पुनर्रचनेत निपाणी वाडगाव हा गट तर निपाणी वाडगावसह कारेगाव या दोन नव्या गणांची वाढ झाली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिदेषदेसाठी 5 गट, तर पंचायत समितीसाठी 10 गणांची फेररचना झाल्याने टाकळीभान, दत्तनगर आदी गट- गणांमध्ये तोडफोड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, हे बदल कुणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दत्तनगर गटात जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे व पत्नी आशाताई दिघे या दाम्पत्याने सलग 10 वर्षे अधिराज्य गाजविले. ते काँग्रेसचे निष्ठावंत माणले जातात. माजी आ. स्व. जयंतराव ससाणे व ना. बाळासाहेब थोरात यांचे ते कट्टर समर्थक आहेत. या गटात पूर्वी गोंधवणी (भैरवनाथनगर) व शिरसगाव गणाचा समावेश होता. आता खंडाळा गाव दत्तनगरला नव्याने जोडले आहे.

उंदिरगाव गटात उंदिरगावसह निमगाव खैरी हे दोन्ही गण जैसे-थे राहिले आहेत. याच गटातून अनुसूचित जमातीच्या जि. प. सदस्या मंगलताई पवार या ससाणे गटाच्या सदस्या होत्या. याच गणातून राखीवमधून मंगलताई मोरे सदस्या होत्या. निमगाव खैरी गणातून माजी सभापती संगीताताई शिंदे (मुरकुटे-विखे) आघाडीकडून निवडून आल्या होत्या. त्या आता विखे गटात आहेत.

टाकळीभान गट नव्या फेररचनेत महत्त्वपूर्ण समजला जातो. कारण या गटात मोठी तोडफोड झाली आहे. या गटात शिरसगाव या नव्या गणाचा समावेश झाला आहे. याच गणातून माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या स्नुषा डॉ. वंदनाताई मुरकुटे निवडून आल्या होत्या. पुढे माजी सभापती संगीताताई शिंदे यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत दावा नेत त्या सभापतीपदावर विराजमान झाल्या होत्या. त्या आ. लहू कानडे यांच्या समर्थक आहेत.

टाकळीभान गटाची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता येथे ससाणे- मुरकुटे, विखे व आदिक या सर्व पक्षीय गटांचे बर्‍यापैकी समप्रमाणात प्राबल्य आहे. शिरसगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या भगिणी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचा नगर पालिकेतील सत्तेच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क वाढल्याने निश्चितच त्यांच्या गटाची मते वाढणार आहेत, असे असले तरी माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे याच भागात रहात असल्याने त्यांचा येथे मोठा जनसंपर्क आहे.

दुसरीकडे माजी सभापती नानासाहेब पवार यांचे टाकळीभान हे गाव असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची राहिल, त्यामुळे त्यांची एक्सप्रेस या गटात धावू शकते. ससाणे-मुरकुटे गटाचे या गटात उत्तम संघटन आहे. विशेष म्हणजे तालुक्यासह या गटातील सुमारे 90 टक्के ग्रामपंचायत व सेवा सोसायट्याची सत्तासूत्रे त्यांच्या हाती असल्याने या गटात तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

निपाणी वाडगाव हा नव्या पुनर्रचनेत नवा गट अस्तित्वात आला आहे. हा गट ससाणे-मुरकुटे यांचा बालेकिल्ला ठरु शकतो. दुसरीकडे याच गटात आ. राधाकृष्ण विखे पा. यांचे खंदे समर्थक माजी सभापती दीपकराव पटारे हे निपाणी गणातून माजी आ. मुरकुटे यांच्या पाठिंब्याने सदस्य व पुढे सभापतीपदी विराजमान झाले होते. पटारे यांच्यासाठी मुरकुटे यांनी पुत्र सिद्धार्थ मुरकुटे यांची उमेदवारी मागे घेतली होती. या गणासह गटातही पटारे यांचा कार्यकर्त्यांशी सतत संपर्क असल्याने ते या रणधुमाळीत अटी-तटीचा सामना करून, विरोधकांना कडवे आव्हान देवू शकतील.

असे असले, तरी या गटात अशोक कारखाना परिसरात मुरकुटे यांचे पारंपरिक मतदार असल्याने राजकीयदृष्ट्या हा त्यांचा बालेकिल्ला माणला जातो. या गटासह गणांमध्ये राष्ट्रवादीचे अविनाश आदिक व काँग्रेसचे आ. लहु कानडे यांच्या गटांना कडवी झुंज द्यावी लागणार असल्याचे बोलले जाते आहे. बेलापूर गट भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथे माजी आ. मुरकुटे गटाकडून शरद नवले जि. प. सदस्य झाले होते. ते आता आ. विखे गटाचे समर्थक आहेत.

पढेगाव गणातून निवडून आलेले माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे हेही आ. विखे यांचे समर्थक आहेत. आ. कानडे गटाचे अरुण पा. नाईक सदस्य आहेत. या गटात भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. असे असले तरी ससाणे-मुरकुटे युती असल्याने या गणांसह गटात ऐनवेळी काहीही राजकीय समिकरणे बदलू शकतात.

येथेही आदिक गटाला ताकद पणाला लावावी लागणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान, गेल्या निवडणुकीपैकी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानची निवडणुकीच्या लढती काहीशा वेगळ्या पद्धतीने लढल्या जाणार असल्याचे अधोरेखित होत आहे. काहींच्या गट- गणातील हक्काचे गाव दुसरीकडे समाविष्ट झाल्याने तेवढे नवे मतदार मिळविणे काहीसे अवघड होणार आहे. अद्यापी ओबीसी आरक्षण व गट-गणांचे आरक्षणाचे चित्र स्पष्ट न झाल्याने इच्छुकांपुढे काहीसा पेच निर्माण झाला आहे.

स्थानिक पातळीवरील युती- आघाडी शेवटी स्वपक्षाच्या ंप्रदेश' निर्णयावरच अवलंबून असणार असल्याचे सध्या तरी अधोरेखित होत आहे. शिर्डीत पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या नव संकल्प अभियानात स्थानिक पातळीवर आघाडी न झाल्यास स्वबळावर लढण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. अन्य पक्षांची नेमकं काय भूमिका व ध्येय धोरणे राहतील, हे प्रत्यक्ष रणधुमाळीपूर्वी स्पष्ट होईल, असे चित्र दिसत आहे.

नव्या बदलांचा लाभ कुणाच्या पथ्यावर..?

आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिदेषदेसाठी 5 गट तर पंचायत समितीसाठी 10 गणांची फेररचना झाल्याने टाकळीभान, दत्तनगर आदी गट- गणांमध्ये तोडफोड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, मात्र हे बदल कुणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news