Uncategorized

औरंगाबाद: कुलगुरूंच्या बंगल्यासमोरील चंदनाचे झाड चोरीला!

मोनिका क्षीरसागर

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: औरंगाबादेत चंदन चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांच्या शासकीय बंगल्यासमोरील चंदनाचे झाड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवत चंदनाच्या झाडाची चोरी केली. शुक्रवारी पहाटे ३ वाजता ही घटना घडली. यामुळे विद्यापीठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

औरंगाबाद येथे आतापर्यंत जिल्हाधिकारी यांचा बंगला, शासकीय विश्रामगृह, विभागीय आयुक्त कार्यालय, पोलिस आयुक्त यांचे निवसस्थान, आ. अतुल सावे यांचा बंगला आदी ठिकाणाहून चंदनाची झाडे चोरट्यांनी चोरून नेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. कुलगुरू प्रमोद येवले यांचे निवासस्थान विद्यापीठ परिसरातच आहे. त्यांच्या बंगल्यासमोरील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले. या व्हीआयपी चंदन तस्करांनी आता पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरच चोरीचे धाडस केल्याने या गोष्टीची मोठी चर्चा झाली होती. आताही विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले. विशेष म्हणजे या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर आहे. तरी देखील चोराने हे धाडस केले आहे.

सुरक्षारक्षकाला दाखवला चाकूचा धाक

चोरट्यांनी शुक्रवारी (दि.१५) पहाटे ३ वाजेच्या सुमारास  सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवत गप्प केले. त्यांनतर आवारातील चंदनाचे झाड कापले. बेगमपुरा पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार घटनास्थळी दाखल होत, त्यांनी परिसराची पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT