Uncategorized

सोलापूर : शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील पक्षावर नाराज का ?

अमृता चौगुले

सांगोला : पुढारी वृत्तसेवा : सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे मंगळवारपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून त्यांची ओळख आहे; पण गेल्या दीड वर्षापासून पक्षामध्ये त्यांची घुसमट सुरु होती. हे आत्ता कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे ते समर्थक मानले जात होते. यामुळे आमदार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असतील व त्यांच्याबरोबर गेल्यावर त्यांना लाल दिव्याची गाडी मिळेल, अशी चर्चा सांगोलामध्ये सुरू झाली आहे.

आमदार शहाजी बापू पाटील हे गेल्या ५० वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आजपर्यत काँग्रेस, अपक्ष, शिवसेना या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आहे. शेकापचे सर्वेसर्वा स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्याबरोबर त्यांनी तब्बल सातवेळा आमदारकी लढवली. त्यामध्ये १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून शहाजी बापू पाटील हे १९२ मताने विजयी झाले. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचे सरकार होते. विरोधी सरकार असूनही सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची शिरभावी ही ८१ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.

शहाजीबापू पाटील यांचे त्यावेळी पासून भाजप व शिवसेनेच्या नेत्यांशी संबंध आले होते.  २०१९ च्या निवडणुकीत स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली. यावेळी शेकाप व राष्ट्रवादी यांची आघाडी होती. पण ही आघाडी धुडकावून राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना उघड मदत केली होती. त्याचबरोबर माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणुकीवेळी शहाजीबापू पाटील यांनी मदत केली. याची दखल घेऊन निंबाळकर यांनीही आपल्या पक्षाबरोबरच त्यांनी स्वतःची ताकत लावून पाटील यांना मदत केली होती.

त्याचबरोबर शेकापने भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी जाहीर केली. पण अचानक त्यांची उमेदवारी नाकारून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या नातवाची उमेदवारी जाहीर केल्याने चिडून जाऊन शेकापच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांना मदत केली. यामुळे गेली साठ वर्षे सांगोला तालुक्यावर शेकापचे वर्चस्व असलेला बालेकिल्ला ढासळला. शहाजीबापू पाटील यांचा ७६८ मताने विजय झाला. आमदार पाटील हे जाहीर सभेमध्ये अनेकवेळा भाजप राष्ट्रवादी, शेकाप व शिवसेनेच्या मतदानामुळे मी निवडून आलो, असे आवर्जून सांगतात.

महाविकास आघाडी सरकारकडून शिवसेनेच्या आमदारांना म्हणावा असा निधी उपलब्ध होत नसल्याने पाटील हे अनेक दिवसापासून नाराज होते. मंत्रालयामध्ये अनेक मंत्री व आमदारही दखल देत नसल्याची त्यांची तक्रार होती. यावर वारंवार ते भाष्य करत होते. निधीबाबत ही सहयोगी पक्षाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. याची सलही त्यांना होती. त्यातच उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला देण्याचे मंजूर झाल्याने सांगोल्यातील जनतेमधील रोषाला आमदार पाटील यांना तोंड द्यावे लागत होते.  मुख्यमंत्री व शिवसेनेतील मंत्री अनेकवेळा आपल्याच पक्षातील असलेल्या शहाजीबापू पाटील यांना वेळ देत नव्हते. याबाबत त्यांची नाराजी होती. ते सतत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संलग्नित होते. त्यांच्याकडून ते नेहमी विविध विकास कामांना निधी मिळवत असत. यामुळे पाटील यांची शिंदे यांच्याबरोबर जास्तच जवळीकता निर्माण झाली होती.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT