गाडीवर चाललेल्या बाप-लेकीला ट्रकची धडक; मुलीचा मृत्यू तर, वडील जखमी | पुढारी

गाडीवर चाललेल्या बाप-लेकीला ट्रकची धडक; मुलीचा मृत्यू तर, वडील जखमी

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: दुचाकी गाडीवर चाललेल्या बाप-लेकीला वारुळवाडीवरून निघालेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये दोघेही गाडीवरून पडून लेकीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर वडिलांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना मंगळवारी २१ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास वारूळवाडीच्या जुन्या ग्रामपंचायतच्या समोर घडली.

तेजश्री बन्सीलाल काळे (वय ३३, रा. घोडेगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचालक गोविंद तुकाराम राठोड (रा. परभणी) हा त्याच्या ताब्यातील मालवाहू ट्रक (एमएच १२ एचडी ६१८२) वारूळवाडीवरून महामार्गांने जात असताना जुन्या वारूळवाडी ग्रामपंचायत समोर ऍक्टिवा मोपेड (एमएच ०४ एचजी २१८९) वर चाललेल्या बन्सीलाल व त्यांची मुलगी तेजश्री हिला मागून धडक दिली. धडकेनंतर दोघेही खाली पडले.

या अपघातामध्ये तेजश्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बन्सीलाल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास हवालदार संतोष कोकणे करत आहेत

Back to top button