वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला…! देहभान विसरून “ज्ञानोबा माऊली”चा जय घोषात वारकरी दंग | पुढारी

वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला...! देहभान विसरून "ज्ञानोबा माऊली"चा जय घोषात वारकरी दंग

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पालखी प्रस्थानावेळी टाळ-मृदंगांचा गजर, आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात वारकरी देहभान विसरून नाचले. यावेळी मंदिर परिसरात त्यांनी चौफेर फुगड्यांचे फेर धरल्याचे पाहायला मिळाले. तसेच, मंदिराबाहेर देखील वारकर्‍यांच्या गर्दीचा भक्तीसागर पहायला मिळाला. पालखी प्रस्थानसोहळ्यानिमित्त आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलिंचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. झेंडू, गुलाब यांच्यासह विविध प्रकारची फुलांनी मंदिर आणि परिसर सजविण्यात आला होता. यामुळे मंदिर परीसराची शोभा आणखीनच वाढली होती.

हाती भगव्या पताका घेऊन टाळ-मृदुनगाच्या गजरात वारकऱ्यांनी एकाच ठेका धरला होता. यावेळी सर्वांच्या मुखी ज्ञानोबा माऊली…, चा जयघोष ऐकू येत होता. त्यातच येथील टाळ मृडुंगाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेले होते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पालखी सोहळ्याला बंदी होती. मोजक्याच वारकर्‍यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा झाला. यंदा मात्र, पालखी सोहळ्याला परवानगी मिळाली.  त्यामुळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यांच्या आगमनाने देहूगावातील वातावरण चैत्यन्यपुर्ण झाले होते. येथे जमलेल्या वारकर्‍यांची गर्दी जणू काही भक्तीसागराप्रमाणेच भासत होती.

माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानावेळी वारकऱ्यांनी एकच ठेका धरत नाचायला सुरुवात केली. ज्ञानोबा माऊलींचा जयघोष कानी पडताच वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला अन परिसरात चौफेर फुगड्यांचे फेर दिसू लागले. दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आळंदी येथे वारकरी येतात. यंदा कोरोनापूर्वीप्रमाणे गर्दी पहायला मिळाली नाही. मात्र, यंदाच्या वर्षी तरुण वारकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पहायला मिळाला…

Back to top button