Uncategorized

औरंगाबाद : आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुंबईतील घरासाठी राष्ट्रवादीचे भीक मांगो आंदोलन

अविनाश सुतार

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : जे स्वतः साठी भीक मागतात, त्या फकिरांनीही चक्क आमदार उदयसिंग राजपूत  (Uday Singh Rajput) यांच्यासाठी मुंबईतील घरासाठी 'फकिरो का घर भी आमदार उदयसिंग राजपूत को दे दो' असे म्हणत कन्नड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

आमदारांची २०२४ मध्ये टर्म संपत आहे. त्यामुळे आमदारांना मुंबईतील कानाकोपऱ्यात का होईना, पण घर द्या, अशी मागणी विधानसभेत करणाऱ्या आमदार उदयसिंग राजपुत (Uday Singh Rajput) यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबन बनसोड व संतोष कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यास तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तालुक्यात गोरगरीब गरजू जनतेचे घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत ४१ हजार प्रस्ताव दाखल आहेत. अडीच वर्षात फक्त १ हजार १२१ घरकुलांना मान्यता मिळाली. त्यातही पूर्ण अनुदान फक्त ३६७ घरकुलांनाच मिळाले आहे. कन्नड तालुक्यात २०१४ साली मंजूर झालेली एमआयडीसी शासनाने रद्द केली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या फाईल २ वर्षापासून प्रलंबित आहेत. या प्रश्नावर आमदार उदयसिंग राजपुत यांनी विधानसभेत कधीही आवाज उठवला नाही. व प्रश्नही मांडला नाही. या उलट गोरगरीबांच्या घरकुलाचे काय ते नंतर पहा पण, अध्यक्ष, मुख्यमंत्री महोदय मला मुंबईत घरकुल द्या हो, अशी केवीलवाणी मागणी विधानसभेत आमदार राजपुत केली. याचा निषेध करण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबन बनसोड, शहर अध्यक्ष अहेमद आली, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, शेकनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस केशव राठोड, युवक तालुका अध्यक्ष कल्याण पवार, काकासाहेब कवडे, पुंडलिक राठोड, मुकेश वेताळ, रत्नाकर पंडित, आप्पा भोजने आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT