पुणे : पुढारी वृत्तसेवा
हिंजवडी फेज-2 मध्ये मेट्रो स्थानकाच्या खांबांसाठी पाया घेण्याचे काम सुरू झाले आहे. दोन खांबांचा पाया बांधण्यात येत असून, महिनाभरात प्रत्यक्ष खांब उभारणी होईल.
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यातर्फे शिवाजीनगर ते हिंजवडी या 23 किलोमीटर मार्गावर मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे.
हिंजवडी, बाणेर आणि गणेशखिंड रस्ता अशा तीन ठिकाणी एकाचवेळी काम सुरू करण्यात आले आहे. स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर महामेट्रोतर्फे मेट्रो उभारणी सुरू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या पीपीपी तत्वावर बांधण्यात येणार्या तिसर्या मार्गावर 23 स्थानके असतील. त्यापैकी आठव्या क्रमांकाच्या स्थानकाचा पाया घेण्यासाठी पायलिंग करण्यात आले.
सहा पायलिंग पूर्ण झाल्यानंतर, त्यावर पायलिंग कॅप म्हणजेच खांबासाठीचा पाया घेतला जातो. त्या कामाची सुरुवात झाली आहे. येत्या पंधरवड्यात दोन खांबांच्या पायाचे काम पूर्ण होेईल. हे स्थानक हिंजवडी फेज 2 मधील हॉटेल विवांताजवळ आहे.