

परभणी ; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक महसूल प्रशासनाने वाळू माफियांसोबत 'सलगी' केल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी वाळू माफियांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून येथील आयपीएस उपविभागीय पोलिस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी मात्र गोदाकाठच्या वाळू माफियांविरोधात दोन हात करण्याचा धडाका लावला आहे.
गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वझुर (तालुका पूर्णा) वाळू धक्क्यावरून अवैध वाळू उपसा करणारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जवळपास ९८ वाळूमाफिया विरोधात शुक्रवारी (दि.१३ मे) पहाटे २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत प्रकरणात ३८ जणांना अटक करण्यात आली, तसेच तब्बल ७ कोटी ३० लक्ष ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुर्णा तालुक्यातील वझुर येथील वाळू घाटावरून नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात बेसुमार वाळू उपसा केला जातो. अशी माहिती परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी गंगाखेडचे आयपीएस उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
त्यानुसार लोढा यांनी कारवाई केली असता वझुर येते २८ हायवा, १ बोट , ५ जेसीबी, अशा वाहनांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्या ठिकाणी ८ दुचाकी, १ चारचाकी असा एकूण जवळपास ७ कोटी ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात सहा. पोलीस उपनिरीक्षक त्रिंबक शिंदे व सहा. पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांच्याकडील तक्रारीवरून ९८ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये ३८ आरोपींना अटक करण्यात आले आहे अशी माहिती श्रेणिक लोढा यांनी 'पुढारी' शी बोलताना दिली. त्यांना न्यायालयात लवकरच हजर करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील वाळू माफियाविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या सर्वात मोठ्या कारवाई प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मीना आयपीएस सहाय्यक पोलीस अधीक्षक सैनिक लोढा व गंगाखेड पोलीस ठाणे प्रभारी सपोनि सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एस. एस. सावंत हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान गंगाखेड तालुक्यासह परिसरात गोदा घाटावर वाळूमाफियांनी हैदोस माजविला आहे. अशावेळी महसूल अधिकारी मात्र वसुलीतच धन्यता मानताना दिसत आहेत. परंतु आयपीएस उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हे मात्र वाळू माफियांचे कर्दनकाळ ठरत आहेत. दीर्घ रजेवरुन परतल्यानंतर श्रेणिक लोढा यांनी सोनपेठ, गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील गोदाकाठी होत असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी वाळूमाफियांविरोधात जोरदार कारवाईची भूमिका घेतली. त्यामुळे वाळू माफियांची पळताभुई थोडी झाली आहे.
महसूलचे जबाबदार अधिकारी वाळू माफियांविरोधातील भूमिकेची तसदी घेत नसल्याने श्रेणिक लोढा यांची ही कामगिरी महसूल प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना मोठी चपराक मानली जात आहे.
दरम्यान गोदाकाठच्या वाळू धक्क्यामध्ये अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे महसुली यंत्रणा नियमबाह्य वाळू उपसांविरोधात कारवाई करण्यास धजत नव्हती. परंतु सहाय्यक पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी कामगिरी वझुर वाळू धक्क्यावर केली. त्यामुळे वाळू धक्क्यात सहभागी व भागीदार असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांची मोठी धावाधाव होत असल्याची स्थिती पहावयास मिळत आहे.
हेही वाचा