वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहेत. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन केरळमधील एम. के. हमराज ऊर्फ शिवराज गायकवाड या तरुणाने एक मे २०२२ ते आजपर्यंत तब्बल १६ हजार किमीचा सायकल प्रवास करीत सुमारे २७० लहान-मोठे गड-किल्ल्यांची भ्रमंती केली. ते वणी येथे पोहोचले असून, वणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले.
केरळच्या कालिकत जिल्ह्यातील शिवराज गायकवाड हा वर्षभरापासून राज्यातील सर्व गड-किल्ले सर करतोय. शिवराजने सौदी अरेबियामध्ये काही दिवस नोकरी केली. त्यानंतर तो भारतामध्ये परतला. त्याला महाराजांच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती नव्हती. त्याला हिंदी किंवा मराठी भाषा येत नसल्यामुळे त्याने इंग्रजी पुस्तकांसह सोशल मीडियावरूनही महाराजांबद्दलची माहिती मिळवली. त्यामुळे तो चांगलाच प्रेरित झाला आणि त्याने गड-किल्ले सर करण्याचा निर्णय घेतला. केरळच्या या तरुणावर शिवाजी महाराजांचा इतका प्रभाव पडला की त्याने चक्क स्वत:चे नावही बदलले. मूळचा हमरास एम. के. असलेला हा तरुण आता चक्क शिवराज गायकवाड झालाय. त्याने नाव बदलण्याची सर्व कायदेशीर प्रक्रियादेखील पूर्ण केली. शिवराजने आत्तापर्यंत १४ महिन्यांच्या कालावधीत सोळा हजार किलोमीटर प्रवास सायकलवर पूर्ण केला. त्याने महाराष्ट्रातील ३७० किल्ल्यांपैकी २७० किल्ले सर केले आहेत. सध्या तो वणीमध्ये आला असून, परिसरातील धोडप, रावळ्या, जावळ्या, अहिवंत, हतगड, मार्कंडेय, रामशेज हे किल्ले सर केले असून, धोडप किल्ला खूप आवडल्याचे शिवराजने सांगितले.
दरम्यान, वणी ग्रामपंचायत कार्यालयात शिवराजचे उपसरपंच विलास कड, वणी मर्चंट बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा, ग्रामपंचायत सदस्य जगन वाघ, नामदेव गवळी, मनोज थोरात, ग्रामस्थ नामदेव घडवजे, जमीर शेख, कैलास धूम, बाळासाहेब गायकवाड, दिगंबर पाटोळे, शैलेश नेरकर, किशोर बोरा, महेंद्र मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण गवळी, सुधाकर महाले, जितेंद्र देशमुख आदींनी स्वागत केले.
हेही वाचा :