अहमदनगर : उड्डाणपुलाखालील रस्त्यावर चिखल, मातीमुळे अपघात | पुढारी

अहमदनगर : उड्डाणपुलाखालील रस्त्यावर चिखल, मातीमुळे अपघात

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे शहरातील उड्डाणपुलाखाली निर्माण झालेल्या चिखल मातीमुळे या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वार घसरून पडत होते. आमदार संग्राम जगताप यांनी या परिसराची पाहणी करत ही समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, उड्डाणपुलाच्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते यांना सूचना दिल्या. त्यानंतर तात्काळ तेथील चिखल माती काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

रस्त्यावर पावसाने चिखल माती आल्याने, दुचाकी वाहने घसरून अनेक नागरिकांना दुखापत झाली. या चिखल मातीमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार गांभीर्याने घेत आमदार जगताप यांनी स्वत: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, उड्डाणपुलाच्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते यांच्यासमवेत रस्त्याची पाहणी केली.

पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला जमा झालेली माती उचलणे गरजेचे असते. प्रशासनाने पावसाळ्या पूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यांच्या दुर्लक्षामुळेच उड्डाणपुलाखाली चिखल मातीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात झाले. याला सर्वस्वी प्रशासन जबबदार आहे, असे सुनावत तात्काळ ही चिखल माती काढून टाकण्याच्या सूचना आमदार जगताप यांनी दिल्या. त्यानंतर रस्त्यावरील चिखल माती काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

हेही वाचा

कोपरगाव तालुक्यामध्ये एमआयडीसी उभारावी

नेवासा : शेतकर्‍यांचा पोटखराबा क्षेत्रदुरूस्तीचा प्रश्न मार्गी

नाशिक : गंगापूर धरणातून ५३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Back to top button