यवतमाळ  
Latest

यवतमाळ : सारस पक्ष्याने पोखरलेला तलाव फुटला, शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान

backup backup

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : सिंचन उपविभागाच्या हलगर्जीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी येथील पाझर तलाव फुटला. हा तलाव काही महिन्यांपूर्वी सारस पक्ष्यांनी पोखरणे सुरू केल्याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी नोंदविले होते.

याबाबत सिंचन विभागाला लेखी सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने अखेर तलाव फुटला. तलावाच्या पाण्यामुळे अनेक शेतातील पिके वाहून गेली, शिवाय गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत गाळ साचला गेला. मागील ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती.

सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातुरमातुर डागडुजी केली. मात्र, मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे हा अनर्थ घडल्याचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले. डागडुजीनंतर केवळ 15 दिवसातच तलाव फुटल्याने त्याला सिंचन विभागच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

झिरपूरवाडी येथे १९८४-८५ मध्ये लाखो रुपये खर्च करून पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावातील पाण्यातून परिसरातील ५० ते ६० हेक्‍टर शेतीचे ओलीत केले जात होते. जनावरांना पाण्याची सोय उपलब्ध झाली होती. बाराही महिने पाणी राहत होते. बुधवारी दिग्रस तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तलाव काठोकाठ भरला.

पाण्याचा दाबाने अखेर शुक्रवारी तलावाची भिंत फुटली. तलावातील पाण्यामुळे परिसरातील शेतातील कपाशी व सोयाबीनचे उभे पीक वाहून गेले. काही शेतातील पिके आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भविष्यातही सिंचनाचा प्रश्‍न निर्माण झाला. केवळ सिंचन उपविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही आपत्ती ओढवली असे झिरपूरवाडीचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले. प्रभारी तहसीलदार बन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

गावाचा पाणीपुरवठा ठप्प

भिंत फुटून आलेल्या पुरामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तीन मोटरपंप व इतर साहित्य वाहून गेले. त्यामुळे गावचा पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. विहिरीत संपूर्ण गाळ साचला आहे.

त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT