Latest

Pune News : खुनाच्या हेतूने अपहरण करणाऱ्या तिघांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

अमृता चौगुले

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  आपल्या बहिणीला भेटायला चाललेल्या एकास तिघांनी दुचाकीवर बळजबरीने बसवुन खुनाच्या हेतूने अपहरण करणाऱ्या तीन आरोपींच्या ओतूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याबाबत ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन कांडगे यांनी माहिती दिली. बुधवारी (दि. ११) दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवम छोटेलाल मिश्रा हा त्याचा मित्र समीर पवन सोनवणे याच्या बहिणीस ओतुर बसस्थानक येथे भेटण्यासाठी आला होता. यावेळी समीर पवन सोनवणे, दिपक यशवंत वाघ व एक अनोळखी मुलगा असे तिघे दुचाकीवरून आले. दिपक वाघ व अनोळखी मुलगा यांनी शिवम मिश्रा याला जबरदस्तीने समीर सोनवणे याच्याकडील मोटारवर बसवून "तुम्ही याला घेवुन पुढे जा मी आलोच" असे म्हणाले.

संबंधित बातम्या :

समीर सोनवणे हा शिवम यास म्हणाला "तेरे को तो पता है हाफ मर्डर से तो फुल मर्डर परवडता है, आज तेरा मर्डर करता हूँ" असे म्हणून मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या अनोळखी मुलास "इसको आज जंगलमे ले जाकर मार डालते है" असे म्हणुन शिवा मिश्रा यास मोटारसायकलवरून जबरदस्तीने ओतुर बसस्थानक येथुन राष्ट्रीय महामार्गाने कल्याणकडे घेवून जात असताना शिवम मिश्रा याने त्यांचेपासून सुटण्याचा जोरदार प्रयत्न केला; मात्र पाठीमागे बसलेल्या अनोळखी मुलाने शिवम मिश्रा याचे दोन्ही हात पकडुन धरून खांद्यावर पाठीमागील बाजुस जोरात चावा घेतला. त्यावेळी शिवम यास आज माझा नक्की मर्डर होणार अशी खात्रीवजा भीती वाटल्याने शिवम मिश्रा याने पुर्ण ताकतीने डावीकडे वाकून चालत्या मोटार सायकलवरून उडी मारली.

ही घटना नगर-कल्याण मार्गावरील राज लॉन्स येथे घडली. यावेळी शिवम मिश्रा हा खाली पडल्याने जखमी झाला आणि त्याचवेळी दोन्ही दुचाकीस्वार फरार झाले. याबाबत शिवम छोटेलाल मिश्रा, (वय ३०, रा. सतीमंदिर मिथ्यारीपुरा, ता. भारताना, इटावा, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. भोसरी, ता. हवेली) याने ओतुर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. ओतूर पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल केले. पोलिसांनी समीर पवन सोनवणे (ओझर नं.१, ता. जुन्नर), दिपक यशवंत वाघ (रा. ओतुर, ता. जुन्नर) आणि अर्जुन शंकर कांबळे (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांना अटक केली. त्यांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील हे करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर, पोलिस हवालदार महेश पटारे, रोहीत बोबंले, विश्वास केदार, बाळशीराम भवारी, जनार्दन सापटे, मनोज कोकणी, दत्ता तळपाडे, देवराम धादवड, नरेंद्र गोराणे, देवीदास खेडकर, धंनजय पालवे या पथकाने कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT